High alert in the district | जिल्ह्यात हाय अलर्ट

जिल्ह्यात हाय अलर्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सततच्या पावसाने संजय सरोवर, धापेवाडा आणि पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीतीरावरील गावात पुराचा धोका निर्माण झाला असून पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शासकीय यंत्रणेला हाय अलर्ट देण्यात आला आहे. पूर परिस्थितीसंदर्भात जिल्हाधिकारी डॉ.नरेश गिते यांनी घेतलेल्या बैठकीत उपाययोजनांसंदर्भात स्पष्ट निर्देश देण्यात आले असून गोसे धरणाची पाणी पातळी २४५ मीटरपर्यंत स्थिर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
भंडारा जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. तसेच मध्यप्रदेशाच्या सीमावर्ती भागातही मुसळधार पाऊस होत आहे. परिणामी संजय सरोवर, धापेवाडा आणि पुजारीटोला धरणाचे दरवाजे उघडून वैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गत आठ दिवसांपासून वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. मंगळवारी तर कारधा येथील लहान पुलावर तब्बल दोन मीटर पाणी होते. दरम्यान मंगळवारी दिवसभर पावसाने उसंत घेतली. त्यामुळे पाणीपातळी खालावली असून वैनगंगेचा लहान पुल बुधवारी खुला झाला. मात्र या पुलावर मोठ्या प्रमाणात झुडपे, मोठाली वृक्ष अडकली आहेत. यासोबतच ग्रामसेवक कॉलनीत बुधवारीही पुराचे पाणी कायम होते. अशा परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी शासकीय यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहे. या बाबत जिल्हाधिकारी डॉ.नरेश गिते यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, माजी पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, निवासी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, उपविभागीय अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, रिना जनबंधू, तहसीलदार अक्षय पोयाम, गजानन कोकर्डे, धनंजय देशमुख, कार्यकारी अभियंता मानवटकर, भंडाराचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास उपस्थित होते. पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना व नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी शासकीय विभागांना अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले.
गोसे प्रकल्पाची पाणी पातळी २४५ मीटरवर स्थिर ठेवण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. ४५ लाईफ जॅकेट असून तातडीच्या वेळी मागणी केल्यास ते उपलब्ध करून दिले जातील. दोन बोट पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सज्ज आहेत. पाणी पातळीत वाढ होत असताना वैनगंगा नदीच्या आजूबाजूला असलेल्या गावांचा वीज पुरवठ्याबाबत सतर्कता बाळगण्याची सूचना देण्यात आली.

पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करा
वैनगंगेला आलेल्या पुरामुळे भंडारा शहराला पाणी पुरवठा करणारी यंत्रणा पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी तातडीने व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. भंडारा शहरातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी पाण्याची पातळी एक ते दोन मीटरने खाली जाणे आवश्यक आहे. कारधा पुलावरील पाण्याची पातळी कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान कारधा येथील सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहेत.
गोसे प्रकल्पाचे ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून ३६८८ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. कारधा येथे वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. बुधवारी दिवसभर भंडारा शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला.

Web Title: High alert in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.