कीटकनाशक फवारणीचा आरोग्याला धोका
By Admin | Updated: March 24, 2015 00:21 IST2015-03-24T00:21:19+5:302015-03-24T00:21:19+5:30
कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांची लागवड शेतकरी करीत असताना दिसतात.

कीटकनाशक फवारणीचा आरोग्याला धोका
पालांदूर : कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांची लागवड शेतकरी करीत असताना दिसतात. पिके लवकर वाढावीत, लवकर उत्पन्न मिळावेत त्याचप्रमाणे रोगप्रतिबंधात्मक उपाय म्हणून पिकांवर मोठ्या प्रमाणात शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करतात. त्यामुळे मानवाच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांची मागणी वाढत गेल्याने देशातील व परदेशांतील अनेक कंपन्यात चढाओढ निर्माण झाली. नवीन वाण बाजारात आले. त्यांचे उत्पादन विक्रम करीत आहेत. यासाठी कीटकनाशकांची फवारणी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. त्यामुळे शेतातून येणारे कारले, भेंडी, वांगी, पालेभाजी, टमाटर आदी पिके विषयुक्त होत आहेत. सर्व पिकांवर उत्पादनांच्या दृष्टीने फवारणी करा असा प्रचार करणारे वैज्ञानिकही आता पिकांवर वापरले जाणारे कीटकनाशके मानवासाठी नुकसानदायक असल्याचे सांगत आहेत. देशात कृषी संशोधनावर कोट्यवधी रुपये खर्च होतो. मात्र यातून होणारे फायदे तोटे सांगायची कुणालाच गरज वाटत नाही. काही कालावधीत आधुनिक शेतीमुळे भरघोस उत्पादन मिळाले. आधुनिक शेतीमध्ये कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. पिकांवर फवारल्या जाणाऱ्या कीटकनाशकांच्या जाहिराती वाढल्या आहेत. यात व्यापारी वर्गाचा मोठा फायदा आहे. त्यांना कीटकनाशकांचे फायदे तोटे चांगले माहित आहे. तरी देखील जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळविण्यासाठी लोकांच्या जीवनाशी खेळले जात आहे. ज्यांना याविषयी माहिती आहे अशांनी आपल्या परसबागेत खाण्यापुरते पालेभाज्यांची झाडे लावून बिगर कीटकनाशकांच्या वापराची पिके घेत आहेत. घरीच सेंद्रीय खत तयार करून झाडांना देत आहे. रसायनांचे दुष्परिणाम लक्षात आल्यानंतर सेंद्रीय शेतीची संकल्पना समोर आली आहे. पूर्वी घरोघरी जनावरांचे कळप असायचे. त्यांच्या मलमुत्रामुळे होणारे सेंद्रीय खत मोठ्या प्रमाणात तयार होत होते. सेंद्रीय खतामुळे पिकांची पौष्टीकता वाढत होती. गोहत्येमुळे सेंद्रीय खत मिळणे कमी झाले आहे. (वार्ताहर)