उद्घाटनाचीच घाई, धान खरेदीचा पत्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 05:00 IST2021-11-08T05:00:00+5:302021-11-08T05:00:46+5:30

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या घरी धान येऊ लागला. या धानावर दिवाळी साजरी हाेईल अशी शेतकऱ्यांना आशा हाेती. अशातच लाेकप्रतिनिधींनी काेणत्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी धान खरेदी हाेईलच अशी घाेषणा केली हाेती. दुसरीकडे शेतकरी व्यापाऱ्यांना धान विकण्याऐवजी आधारभूत केंद्र सुरू हाेण्याच्या प्रतीक्षेत हाेते. अशातच ३० ऑक्टाेबर राेजी सायंकाळी जिल्ह्यातील १०० खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली. ३१ ऑक्टाेबरपासून खरेदीचा मुहूर्त निघाला. साकाेली तालुक्यातून जिल्ह्यातील खरेदीचा प्रारंभ हाेणार असे सांगत उद्घाटनही झाले.

Haste of inauguration, no address to buy paddy | उद्घाटनाचीच घाई, धान खरेदीचा पत्ता नाही

उद्घाटनाचीच घाई, धान खरेदीचा पत्ता नाही

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : धान खरेदीचा दिवाळीपूर्वी मुहूर्त साधत जिल्ह्यात ठिकठिकाणी माेठ्या थाटात उद्घाटन साेहळे पार पडले. मात्र जिल्ह्यातील एकाही केंद्रावर अद्याप एक क्विंटलही धान खरेदी झाली नाही. शेतकऱ्यांची दिवाळीही अंधारात गेली. गाेदाम आणि बारदान्याची समस्या कायम असल्याने जिल्ह्यातील १०० केंद्रांना मंजुरी मिळाली असली तरी नेमकी खरेदी केव्हा सुरू हाेणार, हा प्रश्न आहे.
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या घरी धान येऊ लागला. या धानावर दिवाळी साजरी हाेईल अशी शेतकऱ्यांना आशा हाेती. अशातच लाेकप्रतिनिधींनी काेणत्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी धान खरेदी हाेईलच अशी घाेषणा केली हाेती. दुसरीकडे शेतकरी व्यापाऱ्यांना धान विकण्याऐवजी आधारभूत केंद्र सुरू हाेण्याच्या प्रतीक्षेत हाेते. अशातच ३० ऑक्टाेबर राेजी सायंकाळी जिल्ह्यातील १०० खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली. ३१ ऑक्टाेबरपासून खरेदीचा मुहूर्त निघाला. साकाेली तालुक्यातून जिल्ह्यातील खरेदीचा प्रारंभ हाेणार असे सांगत उद्घाटनही झाले. मात्र हा आनंद काही क्षणाचा ठरला. 
जिल्ह्यातील मंजूर झालेल्या एकाही केंद्रावर अद्यापपर्यंत धान खरेदी सुरू झाली नाही.
जिल्ह्यात एक लाख २५ हजार शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी ऑनलाईन नाेंदणी केली आहे. मात्र अद्यापही खरेदी सुरू न झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. दिवाळीसाठी तर अनेक शेतकऱ्यांनी १५०० ते १६०० रुपये प्रति क्विंटल दराने व्यापाऱ्यांना धान विकला. यात शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले. दिवाळीच्या पर्वात धान खरेदी हाेऊन ऑनलाईन पध्दतीने पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा हाेणे महत्त्वाचे हाेते. मात्र दूरदृष्टीचे नेते असतानाही भंडारा जिल्ह्यात धान खरेदीचे भिजत घाेंगडे कायम आहे. 
धान खरेदी केंद्रावर सुविधांचा अभाव ही दरवर्षीचीच बाब झाली आहे. यंदाही बारदान्याचा अभाव असल्याने धान खरेदी केंद्र सुरू करण्यास अडचण येत आहे. तसेच गाेदामाची समस्याही वर्षानुवर्षे कायम आहे.

बाेनससाठी शेतकरी आग्रही
- महागाईने कहर केला आहे. इंधन दरवाढीचा फटका शेतीलाही बसत आहे. खताची एक बॅग ३०० ते ४०० रुपयांनी महागली आहे. मजुरीही दुप्पट झाली आहे. अशा स्थितीत धान उत्पादनाचा खर्च दीड पटीने वाढला आहे. त्या तुलनेत केंद्र सरकारने हमी भावात केवळ ७२ रुपयांची वाढ केली. १८६८ रुपये हमी भावावरून १९४० वर हमी भाव गेला परंतु महागाईच्या काळात ही दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या ताेंडाला पाने पुसणारी आहे. गतवर्षी धानाला ७०० रुपये बाेनस मिळाला हाेता. मात्र यंदा काेणत्याही हालचाली दिसत नाहीत. बाेनस मिळाला नाही तर धान शेती आतबट्ट्याची हाेणार आहे. त्यामुळे बाेनससाठी शेतकरी अत्यंत आग्रही आहेत.

शासकीय गाेदामाची ताेकडी अवस्था
- दरवर्षी लाखाे क्विंटल धानाची खरेदी भंडारा जिल्ह्यात केली जाते. त्या तुलनेत गाेदामाची संख्या अपुरी आहे. जिल्हा पणन कार्यालयाकडे येणारा धान साठवायचा कुठे, अशा प्रश्न असताे. गतवर्षी तर उघड्यावर धान ठेवावा लागला हाेता. अवकाळी पावसात धान ओला हाेऊन माेठे नुकसान झाले हाेते. धान खरेदीसाेबत गाेदामाची उपलब्धता आवश्यक आहे. 

 

Web Title: Haste of inauguration, no address to buy paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.