गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर
By Admin | Updated: July 19, 2016 00:35 IST2016-07-19T00:35:13+5:302016-07-19T00:35:13+5:30
भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, ...

गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर
आज गुरूपोर्णिमा : शहापुरात महान सत्संग कार्यक्रम, भाविकांची उपस्थिती
भंडारा : भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. विनम्र झाल्याशिवाय ज्ञान मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, असे मार्मिक तथा आत्मिक प्रवचन सद्गुरुदेव सतपाल महाराज यांच्या आत्मअनुयायी व अनुभवी साध्वी मैत्रेय बाईजी यांनी केले.
गुरुपौर्णिमा महोत्सवाचे औचित्य साधून मानव उत्थान सेवा समिती शाखा भंडाराच्यावतीने १८ जुलै (सोमवारी) सकाळी शहापूर येथील गोपीवाडा मार्गावर असलेल्या स्वागत लॉन येथे आयोजित महान सत्संग समारोहात त्या बोलत होत्या. यावेळी मंचकावर साध्वी दिप्ती बाईजी, साध्वी बागीशा, साध्वी महाश्वेता, साध्वी दिक्षीता, महात्मा तुलसीजी, आदी संतगण उपस्थित होते.
सत्संगाची सुरूवात दीपप्रज्वलन तथा सद्गुरु सतपाल महाराज यांच्या चरणपादुकाचे पुजन करून करण्यात आली.
संत्संगादरम्यान बालकांनी पंढरीची वारी यावर आधारीत नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सर्व संतांनी गुरूंची श्रेष्ठता व महिमा यावर आधारीत असे मौलिक प्रवचन केले.
दुपारी ३ वाजता महाप्रसादाने संत्सगाची सांगता करण्यात आली. यावेळी भंडारा, कोदामेढी, अड्याळ, नागपूर, लाखनी, पवनी, चोवा-निमगाव यासह अन्य गावातील आत्मिक भाविकगण उपस्थित होते.
गुरूशिष्याची परंपरा आजही कायम
‘‘गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुदेर्वो महेश्वर:
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम: ’’
आषाढ शुद्ध पौर्णिमा या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो. गुरूंना देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आजही याचे महत्व अनन्यसाधारण आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत कायम आहे. भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. कृष्ण, सुदामा-सांदिपनी, जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.