सलाम तुमच्या मैत्रीला!
By Admin | Updated: January 24, 2016 00:38 IST2016-01-24T00:38:32+5:302016-01-24T00:38:32+5:30
राजकारणात माणूस मोठा झाला की गतकाळाचा विसर पडतो. राजवैभव मिळाले तर वेळेचा अभाव जाणवतो, ...

सलाम तुमच्या मैत्रीला!
राजकारणात माणूस मोठा झाला की गतकाळाचा विसर पडतो. राजवैभव मिळाले तर वेळेचा अभाव जाणवतो, परंतु केंद्रीय भूतल परिवहन, महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे मात्र याला अपवाद ठरले आहे. शनिवारच्या भंडारा जिल्ह्यातील भरगच्च कार्यक्रमाच्या दौऱ्यात कुठलाही उल्लेख नसताना ते हेलिकॉप्टरमधून उतरले आणि कुणालाही कळण्याच्या आत गडकरींच्या वाहनांचा काफिला खांबतलाव चौकाकडे निघाला, तो रामभाऊ आस्वले या मित्राच्या भेटीसाठी.
रामभाऊ ‘सेरेब्रल अॅट्राफी’ या दुर्मिळ आजारामुळे घरीच असतात. अर्धा तासाच्या भेटीत गडकरींनी त्यांच्याशी प्रकृतीविषयी चर्चा केली. ‘रामभाऊ भंडारा जिल्ह्यात तू भाजप रूजविली, तुझ्या कार्याने आज भंडारा भाजपमय झाला’ अशी आठवण करून देत चर्चा सुरू झाल्या. गडकरींचे म्हणणे रामभाऊ ऐकत होते. परंतु आजारामुळे बोल अस्पष्ट निघत होते. रामभाऊंचे बोल वहिणी गडकरींना सांगत होत्या. आता मुंबईला डॉक्टरकडे नेण्याच्या सूचना करून मी डॉक्टरांशी बोलतो, ‘रामभाऊ लवकर बरे व्हा’, असे सांगत त्यांनी मित्राचा निरोप घेतला.
रामभाऊ आस्वले यांनी नागपुरातून बीई आर्किटेक्टची पदवी घेतली. त्यानंतर सिव्हील, टाऊन प्लॅनिंग या अभ्यासक्रमासाठी ते पुण्यात गेले. तिथे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, प्रकाश जावडेकर यांच्याशी अभाविपच्या माध्यमातून त्यांची मैत्री झाली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर भंडाऱ्यात व्यवसायाला प्रारंभ केला. काँग्रेसचा गड असलेल्या भंडाऱ्यातून १९९० मध्ये त्यांनी भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढले आणि आमदार झाले. त्यानंतर सलग तीन निवडणुका त्यांनी जिंकल्या. १९९५ मध्ये युतीचे सरकार असताना त्यांना मंत्रिपदाची संधी होती, परंतु मतदार दुरावतील या भीतीमुळे त्यांनी मंत्रिपद स्वीकारले नाही.
२०१० मध्ये त्यांना आजार लक्षात आला. त्यानंतर ते राजकारणापासून अलिप्त राहू लागले. आजार वाढू लागल्यानंतर ते घरीच राहतात. बोलताना अडखडत असले तरी वृत्तपत्र, दूरचित्रवाहिणीतून जिल्हा, राज्य, देशातील घडामोडींचा वेध घेत असतात. गडकरी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर भंडाऱ्यात आले असताना रामभाऊंच्या भेटीसाठी गेले होते. आता केंद्रात मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा भंडाऱ्यात आले असतानाही त्यांच्या भेटीसाठी गेले, गडकरींची ही भेट निखळ मैत्रीचा पुरावाच म्हणावा लागेल.
राजकारणात असूनही नितीन गडकरी हे शब्द देत नाही, दिला तर तो पाळतात, त्यामुळे त्यांना शब्दाचे पक्के मानले जाते. बांधकाम मंत्री असताना तामसवाडी पुलाच्या उद्घाटनासाठी ते आले. त्यादिवशी त्यांना ‘ताप’ आलेला होता. परंतु दौरा ठरलेला असल्यामुळे ते उद्घाटनासाठी आले होते. ज्या मार्गाने प्रवास सुरू होता तो मार्ग नादुरूस्त होता, त्यावेळी मुख्य मार्ग केव्हा सुरू होईल, असे सोबत असलेल्या पत्रकाराला विचारले. यावर त्या पत्रकाराने हा मुख्य मार्गच असल्याचे सांगितले. यावर ते काहीच बोलले नाही. त्यानंतर वर्षभरात तो २५ कि.मी. रस्ता पुर्ण झाला. आजही हा रस्ता सुस्थितीत आहे.
आजच्या दौऱ्यात त्यांनी जल वाहतुकीबद्दलचे महत्त्व सांगताना जलमार्गाचा पहिला प्रयोग महाराष्ट्रातील वैनगंगा नदीमधून करणार असल्याची घोषणा केली. वैनगंगेतून बसून विशाखापट्टणम पर्यंत मी तुम्हाला घेऊन जाईन, असे अभिवचन दिले, त्यांचे हे अभिवचन पूर्ण होवो, ही सदिच्छा!