चांदपूर ईको टुरिझमला हिरवा कंदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 23:22 IST2017-12-16T23:21:37+5:302017-12-16T23:22:24+5:30
ग्रीनव्हॅली चांदपूर पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पुढाकार घेतला आहे.

चांदपूर ईको टुरिझमला हिरवा कंदिल
मोहन भोयर ।
आॅनलाईन लोकमत
तुमसर : ग्रीनव्हॅली चांदपूर पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पुढाकार घेतला आहे. गुरूवारी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार तुमसरचे तहसीलदार व संबंधित सहा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून ०.५३ हेक्टर जागा पर्यटन महामंडळाला देण्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला. त्यामुळे आता चांदपूर पर्यटन स्थळाचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत.
चांदपूर पर्यटनस्थळाचा विकास मागील अनेक वर्षापासून रखडला आहे. तत्पूर्वी खाजगी कंत्राटदारानी अत्याधुनिक साहित्य व इतर वस्तंूचा वापर करून उल्लेखनीय कामे केली होती. परंतु त्यानंतर शासकीय उदासीनतेमुळे ती बंद पडली. वनविभागाने या पर्यटनस्थळाचा इको टुरिझमध्ये समावेश केला.
सन २००२ मध्ये बीओटी तत्वावर चांदपूर पर्यटन स्थळाचा विकासाचे कंत्राट दिले होते. त्यानंतर या पर्यटनस्थळाकडे सातत्याने दुर्लक्ष झाले होते. गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर तहसीलदार गजेंद्र बालपांडे, वनपरिक्षेत्राधिकारी अरविंद जोशी, सिंचन, भूमी अभिलेख, वीज वितरण कंपनीचे अभियंता, बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी येथे संयुक्त भेट दिली.
तलावाकडे जाणाºया जुन्या ब्रिटीशकालीन विश्रामगृह तथा इतर सदनिकासह गट क्रमांक ५ मधील ०.५३ हेक्टर जागा निश्चित करण्यात आली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला ही जागा देण्याचा सोपस्कर पार पडला. सर्व विभागांनी नाहरकत देण्याचे निश्चित केले. तसा अहवाल तहसिलदारांनी तयार केला. भंडारा जिल्ह्यातील एकमेव ईकोटुरिझम म्हणून या स्थळाला मंजुरी मिळाली आहे, हे विशेष.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार संबंधित सहा विभागातील अधिकाऱ्यांसोबत गुरूवारी पाहणी करून सर्व सहमतीने ०.५३ हेक्टर जागा निश्चित करण्यात आली. तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला असून चांदपूर पर्यटन विकासाची कामे लवकरच सुरू होतील.
- गजेंद्र बालपांडे,
तहसीलदार तुमसर.