दादासाहेबांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची फार मोठी हानी

By Admin | Updated: July 26, 2015 01:08 IST2015-07-26T01:08:18+5:302015-07-26T01:08:18+5:30

बिहार आणि केरळचे माजी राज्यपाल, विधानपरिषदेचे माजी सभापती ज्येष्ठ रिपब्लिकन नेते रा. सू. गवई उपाख्य दादासाहेब यांचे दीर्घ आजाराने नागपूर येथील खासगी रुग्णालयात शनिवारी निधन झाले.

The great loss of the Ambedkar movement due to the demise of Dadasaheb | दादासाहेबांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची फार मोठी हानी

दादासाहेबांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची फार मोठी हानी

भंडारा : बिहार आणि केरळचे माजी राज्यपाल, विधानपरिषदेचे माजी सभापती ज्येष्ठ रिपब्लिकन नेते रा. सू. गवई उपाख्य दादासाहेब यांचे दीर्घ आजाराने नागपूर येथील खासगी रुग्णालयात शनिवारी निधन झाले. गवई ८६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची फार मोठी हानी झाल्याची भावना सर्वस्तरावरुन व्यक्त होत आहे.
विद्वान नेतृत्व हरपला
महामहिम रा. सू. गवई हे राजकारणातील विद्वान होते. त्यांनी देशासाठी केलेले कार्य अभिमानास्पद आहे. त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाने भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
-नाना पटोले, खासदार
सरसेनापती हरवला
दलित समाजाची चळवळ यशस्वीपणे राबविणारा सरसेनापती हरवल्याने दलित समाज पोरका झाला आहे. त्यांची ही उणीव भरुन निघणे अशक्य आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत असलेला शेवटचा तारा निखडला आहे.
-हर्षल मेश्राम, भंडारा
दादासाहेब म्हणजे विचारांचा ठेवा
देशातील अन्य राजकिय पक्षांच्या कार्यकर्त्यांपेक्षा रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांची जवाबदारी सर्वांपेक्षा मोठी आहे. कारण रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना राजकिय, सामाजिक व धार्मिक अशा तिनही आघाड्यावर लढावे लागते, असा मोलाचा संदेश आम्हा रिपब्लिकन कार्यकर्त्यांना देणारे महामहिम दादासाहेब गवई यांच्या नेतृत्वात कार्य करण्याची संधी लाभली. दादासाहेबांच्या निधनाने आंबेडकर चळवळीची व रिपब्लिकन आंदोलनाची फार मोठी हानी झाली आहे.
-असित बागडे,
जिल्हा महासचिव, रिपाइं(ए),भंडारा
दलित चळवळ पुढे घेऊन जाण्यात महत्त्वाचे योगदान
दादासाहेबांच्या जाण्याने दलित चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. मी या नेत्याला सलाम करतो, दलित चळवळ पुढे घेऊन जाण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. दीक्षाभूमीच्या उभारणीतही त्यांचे योगदान आहे.
-यशवंत नंदेश्वर, भंडारा
कार्य सदैव स्मरणात राहतील
दलितांच्या प्रश्नांसाठी सतत अस्वस्थ राहणारा नेता आम्ही गमावला. त्यांच्या निधनाची वार्ता पसरताच भंडारा जिल्ह्यात शोककळा पसरली. त्यांनी देशासाठी केलेले कार्य सदैव स्मरणात राहतील.
-युवराज रामटेके
प्रेमाची उब देणारे दादासाहेबांना सलाम
बाबासाहेबांची चळवळ सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणारे महामहीम रा.सु. गवई उपाख्य दादासाहेबांचे भंडारा जिल्ह्यातच नाही तर देशभरात त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना प्रेमाची उब दिली आहे. कार्यकर्त्यांना नेहमी मार्गदर्शन करून देशसेवा करण्याचा मोलाचा संदेश ते नेहमी देत असत. नेहमी ते सुख-दुख:त ते पाठीशी राहत होते.
-वसंतराव हुमणे, भंडारा
तारा निखळला
बाबासाहेबांच्या विचार प्रणालीने चालून त्यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवून विकासधारेत आणण्यासाठी दादासाहेबांचे कार्य महान आहे. आंबेडकरी समाज हे कदापी विसरू शकणार नाही. त्यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहतील.
-महेंद्र गडकरी, भंडारा

Web Title: The great loss of the Ambedkar movement due to the demise of Dadasaheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.