ग्रामसेवक व रोजगार सेवकाचा मनमानी कारभार
By Admin | Updated: July 22, 2014 23:52 IST2014-07-22T23:52:25+5:302014-07-22T23:52:25+5:30
पंचायत समिती भंडारा अंतर्गत येणाऱ्या माडगी ग्रामपंचायत, ग्रामसेवक डी.डी. सार्वे व रोजगार सेवक श्रीधर करंडे हे विश्वासात न घेता कामे करीत असून त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे.

ग्रामसेवक व रोजगार सेवकाचा मनमानी कारभार
भंडारा : पंचायत समिती भंडारा अंतर्गत येणाऱ्या माडगी ग्रामपंचायत, ग्रामसेवक डी.डी. सार्वे व रोजगार सेवक श्रीधर करंडे हे विश्वासात न घेता कामे करीत असून त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. रोहयोच्या कामातही त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी सरपंच यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
माडगी सरपंच यांनी निवेदनात म्हटले आहे की, माडगी येथे सन २०१२ पासून रोजगार हमी योजने अंतर्गत वनीकरणाचा माध्यमातून वृक्ष लागवड करण्यात आली. याची कल्पना ग्रामसेवक सार्वे व रोजगार सेवक करंडे यांनी कुणालाही दिली नाही. तसेच याकरीता लागणाऱ्या मजूरांच्या मष्टरची व एमबीवर कोणत्याच प्रकारचे कामगारांची स्वाक्षरी घेतलेली नाही. कुठल्याही पद्धतीचे काम न करणाऱ्या मजुरांचेही रोजंदारीचे पैसे देण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. माडगी गावालगतचा जंगलाचा भाग नंबर २४५ मध्ये वनतलाव गट नंबर ४५२ असून याची आराजी दोन हेक्टर आहे. या तलावाचे खोलीकरणाचे काम मंजूर झाले. मात्र ग्रामसेवक व रोजगार सेवकांनी काम न करता फक्त कागदोपत्री त्याची नोंद करून शासनाकडून या कामाचा पैसा उचलला. व शासनाची दिशाभूल केली असून त्या कामाच्या मष्टरची चौकशी व्हावी, अशी त्यांनी या निवेदनातून मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी)