ग्रामीणांची भाकर, वाकळ झाली हद्दपार
By Admin | Updated: May 12, 2015 00:31 IST2015-05-12T00:31:15+5:302015-05-12T00:31:15+5:30
कधीकाळी ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरात आहारात भाकर आणि अंथरूणात वाकळ या दोन गोष्टी हमखास असायच्या ...

ग्रामीणांची भाकर, वाकळ झाली हद्दपार
चपातीचा वाढला आस्वाद ज्वारीचे पीक जिल्ह्यातून गायब होण्याच्या मार्गावर
तुमसर : कधीकाळी ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरात आहारात भाकर आणि अंथरूणात वाकळ या दोन गोष्टी हमखास असायच्या गरिबीचे प्रतीक म्हणून समजल्या जाणाऱ्या या दोन वस्तू आज ग्रामीण भागातून जवळजवळ हद्दपार झाल्या आहेत.
आहारात स्वादिष्ट, पचायला हलकी असणारी गरिबांच्या आहारातील भाकरीने अलिकडे श्रीमंतांच्या घरी होणाऱ्या कार्यक्रमात बुफे नावाच्या आधुनिक प्रकारात एखाद्या कोपऱ्यात का होईना स्थान मिळविल्याचे दिसून येते. या भाकरीला अनादिकाळापासून सोबत करणारा झुणका (बेसन) याने मात्र तिची साथ सोडल्याचे दिसून येते.
भाकरीची जागा गोल गुबगुबीत चपातीने (पोळीने) घेतलेली आहे. पण जिभेला मात्र ते सहन झाले नाही. त्यामुळेच की काय आजही झुणक्यासोबत भाकर हे नाव जोडले जाते. महाराष्ट्रात मागील काही काळ सत्तेवर राहिलेल्या भाजप- सेना युती सरकारने मात्र त्यांचे एकीकरण केले.
त्यामुळे महाराष्ट्रात सुमारे पाच वर्षे याचे प्रेम विविध फलकावर झळकत राहिले. अशी ही भाकर आता नवीन पिढीसाठी इतिहासजमा झाली. भारतात हरितक्रांती होण्याअगोदर बऱ्याच राज्यात ज्वारीचे पीक मोठया प्रमाणात घेतल्या जायचे. कमीत- कमी पाणी या पिकाला लागत असे. तसेच ज्वारी काढल्यानंतर राहिलेले कुटार, कडबा शेतकर्ऱ्यांच्या पाळीव जनावरांना खाद्य म्हणून वापरल्या जात असे. कालांतराने हायब्रिड ज्वारी नावाचा प्रकार जन्माला आला आणि त्यामुळे मूळ ज्वारी पिकविणे बंद झाले.
मुळात भूक या शब्दापासून भाकर हा शब्द तयार झाला असावा. सणासुदी व्यतिरिक्त दोन्ही वेळच्या जेवणात प्रत्येक घरी भाकर तयार केली जायची. जात्यावर दळलेले पीठ कोहपरात गरम पाण्याने (अंदन) भिजवून त्यापासून भाकर तयार केली जायची. साधारणत: तव्यात मावेल एवढया आकाराची भाकर तयार करण्यात त्या काळातील गृहीणींचा हातखंडा होता.
आपल्या धन्याला तव्यावरून काढलेली, काळा पापुद्रा चढलेली भाकर खाऊ घालण्यात वेगळाच आनंद होत असे. याउलट अलीकडे फ्रिजमधून काढलेले थंडे अन्न नवऱ्याला खाऊ घालण्यास काही आधुनिक गृहिणी धन्य मानत असतात. कदाचित यामुळेच आजचे पतिराज एखादेवेळी जेवण करण्यात हॉटेलमध्ये गेल्यानंतर 'गरम रोटी लाओ' असे म्हणत असावेत.
आजही ग्रामीण भागातील गावखेड्यात गेले असता बाहेर एखाद्या ठिकाणी ती वाकळ वाळत असल्याने तिचे दर्शन होते. एरव्ही ती शयनकक्षात मोठया गाद्यांच्या किंवा चादरीच्या खालच्या बाजुला दबलेली दिसून येते. जुन्या काळात माणसाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत तिचा सहवास माणसासोबतच असायचा. मात्र सध्या भाकर व वाकळ ग्रामीण भागातून हद्दपार झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)
जुन्या वस्तूंचा होत असे पुनर्वापर
वाकळ, गोधडी, देशमुख या विविध नावाने प्रचलित असणाऱ्या वाकळीची निमिर्ती उन्हाळ्याच्या काळात घरोघरी होत असे. जुने फाटलेले कपडे, जुने धोतर किंवा लुगड्यांवर अंथरून त्याला सुई- धाग्याने शिवून ही वाकळ तयार केली जायची. साधारणत: एक वाकळ विणण्याकरिता ८ ते १0 दिवस लागत असत. हिवाळ्यात शरीराला ऊब देणारी उन्हाळ्यात गरम न होणारी ही वाकळ प्रत्येकाच्या घरी असायची. त्या काळात ब्लँकेट, चादर, रजई फार कमी दिसायची. परंतु आज या वाकळीची जागा वरील आधुनिक साहित्यांनी घेतली आहे. ग्रामीण भागात जुन्या वस्तूंचा पुनर्वापर करण्याकडे विशेष लक्ष नागरिक गरीब परिस्थितीमुळे देत असत. मात्र बदलत्या जीवनमानानुसार या सर्व पद्धती बंद होत आहेत.