हरभरा हमीभावापेक्षा वधारला पण तुरीच्या दरात २ हजारांची घसरण

By युवराज गोमास | Updated: September 15, 2025 18:31 IST2025-09-15T18:29:27+5:302025-09-15T18:31:29+5:30

Bhandara : कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा वगळता अन्य बहुतेक पिकांच्या दरात हमीभावापेक्षा मोठी घसरण झाली आहे. मुगाचे दर १५६८ रुपयांनी गडगडले. तर उडदाचे दर ३८०० रुपयांनी कोसळले.

Gram price increased above the MSP but the price of turi fell by 2 thousand | हरभरा हमीभावापेक्षा वधारला पण तुरीच्या दरात २ हजारांची घसरण

Gram price increased above the MSP but the price of turi fell by 2 thousand

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
नुकताच गणेशोत्सव संपला. जिल्ह्यात सातत्याने पावसाच्या सरी कोसळत आहेत. पाऊस, ऊन व सावल्यांच्या खेळात शेतकऱ्यांत खरीप हंगाम धोक्यात येण्याची चिंता सतावत आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कडधान्याची आवक मंदावली आहे. आवक घटताच सर्वसामान्यपणे शेतमालाचे भाव वधारतात; परंतु जिल्ह्यात परिस्थिती वेगळीच आहे. केवळ हरभरा वगळता अन्य कडधान्यांचे भाव हमीभावापेक्षा कमालीने घसरले आहेत.

शुक्रवारी भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात हरभऱ्याला हमीभावापेक्षा २५० रुपयांचा अधिक भाव मिळाला. हरभऱ्याचा शासकीय हमीभाव प्रतिक्विंटल ५६५० असून, शुक्रवारी ५७०० ते ५९०० रुपयांचा भाव मिळाला. मात्र, तुरीच्या दरात कमालीची घसरण झाली. तुरीला शासकीय हमीभाव ८००० रुपयांचा असताना प्रत्यक्षात ६००० रुपयांचा भाव मिळाला.

उडदाच्या दरात ३८०० रुपयांची घसरण

कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा वगळता अन्य बहुतेक पिकांच्या दरात हमीभावापेक्षा मोठी घसरण झाली आहे. मुगाचे दर १५६८ रुपयांनी गडगडले. तर उडदाचे दर ३८०० रुपयांनी कोसळले. मंदीचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसतो आहे. केंद्र शासनाने उडदाला ७८०० रुपयांचा हमीभाव जाहीर केला असताना सध्या ४००० रुपयांचा भाव मिळतो आहे. कमीभावामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

मुगाला भाव चढता, सोयाबीन स्थिर

केंद्र शासनाने सन २०२५ साठी मुगाला प्रतिक्विंटल ८७६८ रुपयांचा हमीभाव जाहीर केला; परंतु सध्या बाजार समितीत ६१०० ते ६२०० रुपयांचा भाव मिळाला. हमीभावापेक्षा मुगाचे भाव पडलेले असले तरी भाव चढता असल्याचे दिसून येत आहे. महिनाभरात सोयाबीनची आवक सुरू होणार आहे; परंतु सध्यातरी ५३२८ रुपयांच्या हमीभावापेक्षा कमी म्हणजे ४,३५० रुपयांचा भाव मिळतो. हंगामात दर कमी होण्याची शक्यता आहे.

तुरीला हमीभापेक्षा मिळतेय अल्प भाव

हंगामात सलग व बांधावर सुमारे ९४०० हेक्टरवर तूर पिकाची लागवड झाली. नवी तूर येण्यास आणखी चार महिन्यांचा अवधी आहे. दरवर्षी पावसाळ्यात आवक कमी होत असल्याने तुरीच्या भावात तेजी पाहावयास मिळते. परंतु, यंदा तुरीने शेतकऱ्यांना फसविले आहे. बाजार समितीत आवक कमी असताना तुरीची हमीभावापेक्षा २ हजाराने घसरण झाली.

हमीभाव व बाजारभाव

पीक       हमीभाव          बाजारभाव
हरभरा      ५६५०           ५७००-५९००
तूर            ८०००               ६०००
मूग          ८७६८            ६१००-६२००
उडद        ७८००               ४०००


"सध्या पावसाळा सुरू असल्याने भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीत कडधान्यांची आवक मंदावली आहे. बाजारभावात तेजी-मंदी सुरू असते. दिवाळीच्या पर्वात भाव वाढ होण्याचा अंदाज आहे."
- सागर सार्वे, व्यवस्थापक, बाजार समिती, भंडारा

Web Title: Gram price increased above the MSP but the price of turi fell by 2 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.