गोवारीटोला येथे आजाराची लागण
By Admin | Updated: October 4, 2014 23:21 IST2014-10-04T23:21:27+5:302014-10-04T23:21:27+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्र लेंडेझरी अंतर्गत येणाऱ्या गोवारी टोला येथे विविध रोगाची ग्रस्त पाच जणांचा मृत्यू झाला. महिनाभरात हे मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

गोवारीटोला येथे आजाराची लागण
जांब (लोहारा) : प्राथमिक आरोग्य केंद्र लेंडेझरी अंतर्गत येणाऱ्या गोवारी टोला येथे विविध रोगाची ग्रस्त पाच जणांचा मृत्यू झाला. महिनाभरात हे मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
पिटेसूर गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गोवारीटोला हे गाव आदिवासीबहुल भागात येत असुन परिसर जंगलानी व्यापलेला आहे. या ठिकाणी आरोग्याच्या सुविधांची अपुरी व्यवस्था आहे. मागील काही दिवसांपासून या परिसरामध्ये विविध रोगांची लागण झाली आहे. या गावांमध्ये ८० ते १०० लोक आजही विविध आजारांने ग्रस्त असून ते खाटेवर असल्याचे आढळून येते.
सप्टेंबर महिण्यामध्ये विविध आजाराने पाच व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रमेश देवराम राऊत (१७), श्रावण फागु शेंभरे (६०), कल्पना प्रेमलाल चौधरी (३५), अंकीता मोतीराम चौधरी (१४) तर सिकलसेल आजाराने आकाश अशोक भोंडे (२२) यांचा समावेश आहे.
महिनाभरात विविध आजाराने पाच जणांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या गंभीर समस्येकडे आरोग्य विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाकडून विविध सर्वे, तसेच डेंग्यु प्रतिबंधात्मक जनजागृती केल्याचे वैद्यकीय अधिकारी लुंगे हे सांगत आहे. तसेच ग्रामपंचायतकडून डास प्रतिबंधक फवारणी, धूर फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
या परिसरामध्ये आरोग्य सुविधांचा अभाव असून आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याचे गावकऱ्यांकडून बोलले जात आहे. तरी आरोग्य विभागाने गोवारीटोला येथे त्वरीत आरोग्य शिबिराचे आयोजन करून नागरिकांवर औषधोपचार करण्याची मागणी सरपंच गुरुदेव भोंडे तसेच गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)