वस्तू व सेवाकर कायदा व्यापारी व ग्राहकांच्या हिताचा

By Admin | Updated: June 28, 2017 00:34 IST2017-06-28T00:34:27+5:302017-06-28T00:34:27+5:30

केंद्र व राज्यातील १७ कर रद्द करून एकच वस्तू व सेवाकर कायदा १ जुलैपासून देशभरात लागू होणार आहे.

Goods and service tax law for merchants and consumers | वस्तू व सेवाकर कायदा व्यापारी व ग्राहकांच्या हिताचा

वस्तू व सेवाकर कायदा व्यापारी व ग्राहकांच्या हिताचा

नाना पटोले : व्यापारी वर्गासाठी कार्यशाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : केंद्र व राज्यातील १७ कर रद्द करून एकच वस्तू व सेवाकर कायदा १ जुलैपासून देशभरात लागू होणार आहे. प्रास्तावित वस्तू व सेवाकर कायद्यात (जीएसटी) व्यापारी व ग्राहकांचे हित जोपासल्या जाणार आहे. हा कायदा सर्वसमावेशक असून या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर महागाई वाढणार नसल्याचे खासदार नाना पटोले यांनी सांगितले.
खा.नाना पटोले यांच्या पुढाकाराने भंडारा व्यापार संघ व विक्रीकर कार्यालय भंडारा यांच्या विद्यमाने जिल्हा परिषद सभागृहात जीएसटीबाबत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी विक्रीकर अधिकारी गोपाल बावने, सहाय्यक विक्रीकर अधिकारी प्रविण निनावे, विक्रीकर अधिकारी संदीप डहाके, विक्रीकर अधिकारी राजेश राऊत, भाजप जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी उपस्थित होते.
व्यापारी व ग्राहकांनी वस्तू व सेवाकर कायद्याबाबत घाबरण्याचे काहीच कारण नाही. जीएसटीमध्ये कर दराने ०, ५, १२, १८, २८ टक्के असे स्लॅब ठेवण्यात आले आहे. सध्याच्या कर दराजवळ असणाऱ्या स्लॅबमध्ये त्या वस्तू आणि सेवांचे दर ठेवण्यात आले आहे. या स्लॅबमध्ये कुठल्या वस्तू आणि सेवा याबाबत शासनाने नियम ठरवून दिले असून त्या नियमांतर्गत कर आकारले जातील असे त्यांनी सांगितले.
जीवनावश्यक वस्तूंना जर राज्याच्या कर दरातून सुट असेल तर त्यांना जीएसटीमध्ये सुट राहणार आहे. शिवाय जीएसटीमध्ये करावर कराचा भार नसल्याने कराचा बोजा कमी होवून वस्तूंच्या किमतीमध्ये कमी येईल व वस्तू स्वस्त होतील, असेही ते म्हणाले. व्यापाऱ्यांत जीएसटीबाबत जागृती करण्यासाठी तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांना पूर्वीसारखे अनेक ठिकाणी नोंदणी करण्याची आवश्यकता नसून जीएसटी अंतर्गत एकच नोंदणी करावी लागणार आहे. ज्या राज्यात वस्तू वापरल्या जाईल त्या राज्याला हा कर प्राप्त होईल, असे सांगून विक्रीकर अधिकारी गोपाल बावने यांनी सांगितले. पेट्रोलियम पदार्थ आणि मद्य सध्या जीएसटी कार्यक्षेत्राबाहेर आहे. परंतु या उद्योगासाठी लागणारा कच्चा माल जीएसटी अंतर्गत आहे. या नवीन कर कायद्यातील तरतुदी सोप्या असतील. ज्या व्यापाऱ्याचा वार्षिक लेखाजोखा २० लाखाच्या आत असेल त्यांना नोंदणी करणे अनिवार्य नसेल. जगातील सर्व जीएसटी कायद्याचा अभ्यास करून आपला जीएसटी कायदा अधिक सुटसुटीत केला आहे, असे गोपाल बावने म्हणाले. जीएसटी कायद्याचे व्यापारी वर्ग स्वागत करीत असून हा कायदा खूप सरळ व उपयोगी असल्याच्या प्रतिक्रिया व्यापारी वर्गात आहेत. या कार्यशाळेत व्यापारी वर्गाच्या सर्व शंका व प्रश्नांचे गोपाल बावने यांनी निरसन केले.

Web Title: Goods and service tax law for merchants and consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.