गोंडउमरीला समस्यांचे ग्रहण
By Admin | Updated: September 27, 2015 00:34 IST2015-09-27T00:34:25+5:302015-09-27T00:34:25+5:30
साकोली तालुक्यातील गोंडउमरी हे गाव भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. याठिकाणी कर्मचारी येण्यासाठी नकार देतात.

गोंडउमरीला समस्यांचे ग्रहण
सुविधांचा अभाव : आरोग्य केंद्र असूनही डॉक्टरअभावी रूग्णांना त्रास
निश्चय रामटेके गोंडउमरी
साकोली तालुक्यातील गोंडउमरी हे गाव भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. याठिकाणी कर्मचारी येण्यासाठी नकार देतात. पोलीस चौकी, रेल्वे स्थानक, शाळा, महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशु रुग्णालय असुनही परिसरातील नागरिकांना नानाविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
ग्रामपंचायत कार्यालय असूनही येथील सरपंच व उपसरपंचांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे गावकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशासनाने सचिवाची नियुक्ती केली आहे. मात्र, सचिव हे दोनच दिवस काम पाहतात. अन्य शासकीय कार्यालयातील कर्मचारी हे मुख्यालयी न राहता तालुका व जिल्हास्थळावरून जाणे-येणे करतात. ग्रामपंचायत रहिवासी दाखले, जातीची दाखले, सचिवाचे दाखले, यासाठी नाहक त्रास सहन करावे लागत आहे. येथील सरपंच, उपसरपंचांचे अडीच वर्षांचा कार्यकाळ होता. दोघांनीही परस्परांविरूध्द न्यायालयात प्रकरण सादर केल्यामुळे नागरिकांचे कामे खोळंबली आहेत.
शासकीय कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी क्वॉर्टरची सुविधा उपलब्ध करून दिले आहे. येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी बाहेरगावावरून जाणे-येणे करतात. याठिकाणी महिला डॉक्टर देण्याची मागणी केली असली, तरी महिला डॉक्टर अद्याप देण्यात आलेली नाही.
तलाठी कार्यालय साझा क्र. २२, महसुल विभागाचे कार्यालय आहे. बोबदे, सालई, वांगी गोंडउमरी असे चार गावांचा कारभार एका तलाठ्याकडे सोपविण्यात आले. याठिकाणी तलाठी पद रिक्त आहे. तलाठी कार्यालयाकरिता राखीव जागा असून तलाठी कार्यालय येथे भाड्याच्या घरात आहे. शेतकऱ्यांना कामासाठी तलाठी कामासाठी उंबरठे झिजवावे लागत आहे. तलाठी कार्यालयातील कामे करण्यासाठी कोतवाल, लिपिकाची आवश्यकता आहे. महसूल विभागाकडून सहकारी न मिळाल्याने एका युवकाकडून नागरिकांची कामे करून सेवा पुरविली जात आहे.
पशुधन अधिकाऱ्याची मागणी
येथे उच्चश्रेणी पशुधन दवाखाना आहे. मात्र, डॉक्टर नाहीत. याठिकाणी कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी क्वॉर्टर आहेत. त्याची अद्याप दुरुस्ती झालेली नाही. बाहेरील आवारात केरकचरा, धान पडून असल्याने दुर्गंधी पसरली आहे. क्वॉर्टरची दारे चोरीला गेले आहेत. येथील विद्युत सुविधा बंद असून पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. हातपंप बंद अवस्थेत आहे. जनावरांच्या पिण्यासाठी टाकी बांधण्यात आली. मात्र हातपंप बंद असल्याने पाणीसुध्दा मिळत नाही. येथे उच्च श्रेणी डॉक्टर देण्यात यावा व जनावराना सेवा उपलब्ध करुन द्यावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
पोलीस चौकीची समस्या
गोंडउमरी पोलीस चौकीला नक्षलग्रस्त चौकी म्हणून ओळखले जात असून १९९६ मध्ये येथे पोलीस चौकी स्थापन करण्यात आली. ही पोलीस चौकी ग्रामपंचायतीच्या गाळ्यामध्ये आहे. याठिकाणी विद्युत बिल पोलीस चौकीच्या कर्मचाऱ्यांना भरावे लागते. या चौकीमध्ये टेबल खुर्ची, साहित्य ठेवण्यासाठी आलमारी नाही. पोलीस चौकी स्थानिक जागा रिक्त असून रिकाम्या जागेवर लोकाची वहिवाट सुरु आहे. नागरिकांनी रिकाम्या जागेवर तणस, काड्या, विटा, रेती यासारखे साहित्य ठेवले आहेत.
ग्रामपंचायतमार्फत ठराव घेऊन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना २००३ मध्ये पोलीस ठाण्याचा प्रस्ताव पाठविला. मात्र, अद्याप पोलीस ठाणे दिले नाही. या गावात पोलीस चौकी असून यामध्ये १५ ते १६ गावांचा समावेश आहे. या चौकीला वडद, सुकळी, महालगाव, वागूली, पळसगाव, सोनक, पापळा, पापडा खुर्द, चिंगी, निलज, वांगी सालई, बोळदे आदी गावे जोडलेली आहे. हेड कॉन्स्टेबल दर्जाचे एकच कर्मचारी काम बघत आहे. त्यामुळे पोलीस शिपाई देण्याची मागणी होत आहे.