भंडारा जिल्ह्यातील ७७ वर्षीय आजोबांची सुवर्ण कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 02:09 PM2021-09-22T14:09:23+5:302021-09-22T14:14:19+5:30

पोहरा येथील ७७ वर्षीय डॉक्टर सुदाम शहारे हे नोव्हेंबर महिन्यात स्पेन येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

Golden performance of 77 year old man from Bhandara district | भंडारा जिल्ह्यातील ७७ वर्षीय आजोबांची सुवर्ण कामगिरी

भंडारा जिल्ह्यातील ७७ वर्षीय आजोबांची सुवर्ण कामगिरी

googlenewsNext
ठळक मुद्देगोवा येथील बॅडमिंटन स्पर्धा : स्पेनमधील जागतिक स्पर्धेसाठी निवड

चंदन मोटघरे 
भंडारा : जिद्द, चिकाटी आणि खेळाडूवृत्ती असेल तर काेणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यासाठी वयही आडवे येत नाही. अशीच देदिप्यमान कामगिरी लाखनी तालुक्यातील ७७ वर्षीय आजोबांनी केली. गोवा येथे झालेल्या ऑल इंडिया बॅडमिंटन मास्टर स्पर्धा जिंकून स्पेनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. तरुणांनाही लाजवणारे हे आजोबा आहेत पोहरा येथील सुदाम शहारे. ते व्यवसायाने डॉक्टर आहेत.

तालुक्यामधील पोहरा येथील डॉ. सुदाम शहारे यांनी गोवा येथे झालेल्या ऑल इंडिया बॅडमिंटन मास्टर स्पर्धेत साठ वर्षांवरील गटात भाग घेतला. २१ सप्टेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेत देशातील ४ स्पर्धकांना हरवून त्यांनी विजय करत आपल्या जिल्ह्यासह राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. आता नोव्हेंबर महिन्यात स्पेन येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत ते भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

डॉ. शहारे या ७७ वर्षीय आजोबांनी तरुणांना लाजवेल अशी कामगिरी केली आहे. तसा त्यांचा मूळ पेशा हा डॉक्टरी होता. भारतीय जनता पक्षाकडून राजकीय कारकीर्द गाजविली होती. परंतु त्यांनी अपल्यातील खेळाडूला कायम जिवंत ठेवले आणि या वयातही सुवर्ण कामगिरी केली आहे. डॉ. शहरे रोज लाखनी येथील क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्टात प्रॅक्टिस करतात, १ तास पोहण्याचा आनंद घेतात. विभागीय व जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करून तरुणांना प्रोत्साहन देत असतात. यापूर्वीही डॉक्टर शहारे यांनी अनेक स्पर्धा गाजविल्या आहे. त्यांचा उत्साह तरुण पिढीला प्रेरणादायी आहे.

प्रोत्साहन देण्यासाठी गावकरी थेट गोव्यात

आपल्या गावातील आजोबा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार असल्याची पोहरा येथे माहिती मिळताच गावकऱ्यांनी सरपंच रामलाल पाटणकर व मंगेश मेश्राम यांच्या पुढाकारातून थेट गोव्याची तयारी केली. सुदाम शहारे यांना गावकऱ्यांनी प्रोत्साहन दिले. विजयानंतर गोव्यात जल्लोष साजरा केला. डॉ. शाहरे यांची कामगिरी आमच्या पोहरा गावच्या इतिहासात घडलेली ऐतिहासिक घटना आहे असे सरपंच रामलाल पाटणकर अभिमानाने सांगतात.

Web Title: Golden performance of 77 year old man from Bhandara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.