भंडारा पोलिसांच्या सतर्कतेने नागपुरात सोनेरी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 05:00 IST2021-08-19T05:00:00+5:302021-08-19T05:00:48+5:30
भंडारा तालुक्यातील विनोद भुजाडे या सराफा व्यवसायीकाची ७५ लाखांचे दागिने असलेली बॅग सोमवारी दुकानासमोरुन लंपास करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे जयवंत चव्हाण यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलीस अधीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनात तपास सुरु झाला.

भंडारा पोलिसांच्या सतर्कतेने नागपुरात सोनेरी टोळी जेरबंद
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सराफा व्यवसायीकाचे ७५ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने पळवून नेणारी आंतरराज्यीय टोळी भंडारा पोलिसांच्या सतर्कतेने अवघ्या २४ तासात जेरबंद झाली. नागपूर पोलिसांच्या मदतीने कळमना येथून सहा जणांना अटक करण्यात आली. तेव्हा त्यांच्या जवळून पाऊण कोटींच्या दागिन्यांच्या चोरीचा छडा लागला. भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मार्गातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढला आणि एक आंतरराज्यीय टोळी पोलिसांच्या हाती लागली.
भंडारा तालुक्यातील विनोद भुजाडे या सराफा व्यवसायीकाची ७५ लाखांचे दागिने असलेली बॅग सोमवारी दुकानासमोरुन लंपास करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे जयवंत चव्हाण यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलीस अधीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनात तपास सुरु झाला. परंतु कोणताही थांगपत्ता लागत नव्हता. पोलिसांनी चोरटे कोणत्या मार्गाने गेले याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन मिनिटानंतर कुठे गेला हे कळायला मार्ग नव्हता. पोलिसांनी बोरगाव फाटा, चिखली फाटा, कुही मार्ग व इतर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. परंतु थांगपत्ता लागत नव्हता.
चोरटे पळून गेल्याची दिशा निश्चित मिळत नसल्याने पोलिसांनी उलट्या दिशेने प्रवास सुरु केला. चोरटे कोणत्या मार्गाने आले याचा शोध घेतला. यावेळी माथनी टोल नाक्यावर त्यांचा माग मिळाला. त्यानंतर पारडी, कळमना परिसरातील फुटेज तपासण्यात आले. नागपूरच्या बेला नगरच्या गल्लीतुन बाहेर पडताना चोरटे दिसले. त्यावरुन भंडारा पोलिसांनी नागपूर शहर क्राइम ब्रांचची मदत घेतली. नागपूर पोलिसांच्या पथकाने मंगळवारी सहा जणांच्या मुसक्या कळमना परिसरातून आवळल्या.
या टोळीने भंडारासोबतच नागपूर, गोंदिया आणि गुजरातमध्येही दरोडे टाकून पाऊण कोटी रुपयांचे दागिने पळविल्याचे पुढे आले. चोरटे सध्या नागपूर पोलिसांच्या ताब्यात असून रात्री उशिरापर्यंत भंडारा पोलीस त्यांना ताब्यात घेणार असल्याचे सांगण्यात आले.
एलसीबीचे पथक नागपुरात तळ ठोकून
- ठाणा येथे चोरी झाल्यानंतर चोरट्यांचा माग नागपूरात आढळून आला. तेव्हापासून भंडारा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूरात तळ ठोकून आहेत. एलसीबीचे प्रमुख जयवंत चव्हाण यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक विवेक राऊत, सुनील उईके, रवींद्र रेवतकर आणि इतर बारा कर्मचारी नागपूरातच आहेत. या सहा चोरट्यांना ताब्यात घेतल्यानंतर ते भंडारा येथे येणार असल्याची माहिती आहे. जवाहरनगरचे ठाणेदार पंकज बैसाने यांनीही या चोरीचा छडा लावण्यात मोलाचे सहकार्य केले.