पाच वर्षांपासून गोडाऊन भाडे मिळालेच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:35 IST2021-03-26T04:35:17+5:302021-03-26T04:35:17+5:30

मुखरू बागडे पालांदूर : आधारभूत धान खरेदी केंद्र अंतर्गत जिल्ह्यात धान खरेदी सुरू आहे. शासनाकडे व धान खरेदी ...

Godaun has not received rent for five years! | पाच वर्षांपासून गोडाऊन भाडे मिळालेच नाही!

पाच वर्षांपासून गोडाऊन भाडे मिळालेच नाही!

मुखरू बागडे

पालांदूर : आधारभूत धान खरेदी केंद्र अंतर्गत जिल्ह्यात धान खरेदी सुरू आहे. शासनाकडे व धान खरेदी केंद्राकडे स्वतःची कोठार व्यवस्था नाही. त्यामुळे भाडे तत्त्वावर खासगीतील कोठार भाड्याने घेतले जाते. मात्र त्यांचे भाडे नियमित मिळत नाही. २०१५-१६ वर्षापासून भाडे उधारीवर असल्याने गोडाऊन मालक संकटात सापडले आहेत. गत पाच वर्षांपासून एक रुपयासुद्धा कोठार मालकांना मिळालेला नाही.

संपूर्ण भंडारा जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्र अंतर्गत शेतकऱ्यांना आधार दिला जातो. परंतु ज्याच्या भरोशावर आधार दिला जातो, त्याच कोठार मालकांना निराधार करण्याचा अजब प्रकार शासन व प्रशासनाने केलेला आहे. गत पाच वर्षांपासून शासन व प्रशासनाने भाड्याचा एक रुपयासुद्धा कोठार मालकांला दिलेला नाही. निश्चितच हे न्यायाला धरून नाही. व्यापारी दृष्टिकोनातून बघितले असता बँकांचे लाखो रुपयांचे कर्ज घेऊन ही कोठारे बांधली गेली आहेत. त्यांचे व्याज नियमित सुरू आहे. पाच वर्षांचे भाडे अजूनपर्यंत न मिळाल्याने बँकांचे कर्ज व्याजासह दुप्पट झालेले आहे. मात्र निर्दयी शासन व प्रशासनाला कोठार मालकांच्या समस्येची दया अजूनपर्यंत आलेली नाही. निश्चितच हे भंडारा जिल्ह्यातील शासन, प्रशासनासह लोकप्रतिनिधींनासुद्धा न शोभणारे आहे.

कोठार दहा महिने वापरायचे व भाडे केवळ दोन महिन्यांचे द्यायचे. अशा चुकीच्या धोरणाने कोठार मालकांची आर्थिक गळचेपी केली जात आहे. बांधकाम विभागाच्या वापरातील जागेच्या हिशेबाने नियमानुसार भाडे अपेक्षित असताना केवळ खरेदी झालेल्या धानाच्या वजनाच्या हिशेबाने भाड्याचा हिशेब निर्धारित केला जातो. हे धोरण संपूर्ण चुकीचे असून वापर केलेल्या दिवसाचे भाडे यापूर्वी ज्या पद्धतीने दिले जायचे त्याच पद्धतीने देणे अगत्याचे आहे. मात्र असे न झाल्याने कोठार मालकांच्या समस्या वाढल्या आहेत.

बॉक्स

पालांदूर येथील कोठार मालक लता कापसे यांचे पाच वर्षांचे ९ लक्ष ३२ हजार ५७५ रुपये, मुरली कापसे यांचे ८ लक्ष १५ हजार एवढे भाडे २०१५-१६ ते २०१९-२० पर्यंतचे शासन, प्रशासनाकडे थकीत आहे. शासनाच्या हिशेबाने एवढी रक्कम गत पाच वर्षांपासून थकलेली आहे. गोडाऊन बनविण्याकरिता बँक अंतर्गत कर्ज घेऊन बांधकाम केलेले आहे. कर्जाची रक्कम शिल्लक असल्याने व्याजावर व्याज चढत असून, मुद्दलापेक्षा अधिक व्याजाची रक्कम होत आहे. जिल्हा मार्केटिंग कार्यालय भंडारा यांनी पुढाकार घेऊन कोठार मालकांना न्याय द्यावा, अशी मागणी पालांदूर येथील कापसे यांनी केली आहे.

कोट बॉक्स

जिल्ह्यातील शिल्लक असलेल्या कोठार भाड्याचे मागणी प्रस्ताव संस्थेकडून अजूनपर्यंत जिल्हा कार्यालयाला आलेले नाहीत. पालांदूर येथील संस्थेने पुरविलेले आहेत. परंतु संपूर्ण जिल्ह्यातील प्रस्ताव न आल्याने वरिष्ठ स्तरावर पाठविता आले नाहीत. त्यामुळे सदर कोठार मालकांचे भाडे पाच वर्षांपासून शिल्लक आहे.

- गणेश खर्चे, जिल्हा पणन अधिकारी, भंडारा.

Web Title: Godaun has not received rent for five years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.