मुलींना आत्मसंरक्षण व उच्चशिक्षण द्या
By Admin | Updated: February 19, 2017 00:23 IST2017-02-19T00:23:52+5:302017-02-19T00:23:52+5:30
मुलींनो आई वडीलांचे स्वप्न पूर्ण करा, कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका, आपल्या भावना आईवडीलांजवळ व्यक्त करा.

मुलींना आत्मसंरक्षण व उच्चशिक्षण द्या
रश्मी नांदेडकर : ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ संकल्प उत्सव
भंडारा : मुलींनो आई वडीलांचे स्वप्न पूर्ण करा, कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका, आपल्या भावना आईवडीलांजवळ व्यक्त करा. आई सारखी मैत्रीण कुणीही असूच शकत नाही, तुमच्या मदतीसाठी दामीनी पथक सदैव २४ तास तयार आहे. असे प्रेरणादायी उद्गार भंडारा अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी व्यक्त केले.
तालुकास्तरीय बेटी बचाओ बेटी पढाओ संकल्प उत्सवाप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा महिला व बाल समुपदेशक मृणाल मुनेश्वर तर प्रमुख अतिथी म्हणून समर्पीत सामाजिक कार्यकर्त्या विशाखा गुप्ते, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.स्नेहल बांडेबुचे, जयश्री सावरकर, हेमलता सरादे, गटशिक्षणाधिकारी शामकर्ण तिडके, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शंकर राठोड व प्रभारी मुख्याध्यापक हटवार उपस्थित होते. बेटी बचाओ, बेटी पढाओ या संकल्प उत्सवाप्रसंगी वर्ग ८ वी च्या विद्यार्थिनी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकातून वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शंकर राठोड यांनी कमी होत असलेले मुलींचे जन्मदर वाढवून त्यांना उच्च शिक्षण देणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. मुलींच्या मनातील भीती घालविताना पालक व शिक्षकांनी सदैव जागरूक राहावे, मुलींनी चुकीच्या मार्गाने जाऊ नका, शरीराला जपा, कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, असा मूलमंत्री मृणाल मुनेश्वर यांनी सांगितला. पालकांनी वंशाला दिवाच पाहिजे असा अट्टाहास करू नका, मुलीला कमी समजू नका, तिला स्वत:च्या पाायवर उभी होण्यासाठी सबळ मदत करा, किशोरावस्थेमध्ये शारीरिक व मानसिक बदल होतात, तेव्हा त्यांची काळजी घ्या असा उपदेश देताना विशाखा गुप्ते यांनी एज्युकेशन या शब्दाचे महत्व व बाल अधिनियम या विषयी मार्गदर्शन केले. आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे सांगताना डॉ.स्नेहल बांडेबुचे यांनी मुलींनो स्वत:ची काळजी घ्या, आत स्वच्छ धुवा, भरपूर पाणी प्या, दररोज व्यायाम करा व सदैव मन प्रसन्न ठेवा असा सल्ला देताना मुलींच्या प्रश्नरुपी शंकांचे निरसन केले. जयश्री सावरकर यांनी गीत सादर करून बेटी बचाओ, बेटी पढाओ या संकल्प उत्सवाचे महत्व सांगताना जिल्ह्यातच हे संकल्प उत्सव साजरे केले जात असल्याबद्दल मुलींचे गुणगौरव केले. प्रास्ताविक शंकर राठोड, संचालन विलास चौधरी व ज्योती नागलवाडे यांनी केले. तर आभार अध्यापिका चोले यांनी मानले. रामकृष्ण वाडीभस्मे, अरुण झुरमुरे, अश्विन रामटेके, सुधीर भोपे, हेमलता सरादे, अर्चना बेदरकर, वनिता भेंडारकर, सविता देशमुख आदींनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)