कालौघात गावरान आंबा दुर्मिळ
By Admin | Updated: April 30, 2015 00:35 IST2015-04-30T00:35:05+5:302015-04-30T00:35:05+5:30
कडक उन्हाळा सुरू होताच वेध लागतात ते आंब्याच्या रसाचे. याच काळात लग्न समारंभ होत असल्याने पाहुण्यांना ....

कालौघात गावरान आंबा दुर्मिळ
बेसुमार वृक्षतोड कारणीभूत : आमराई झाली इतिहासजमा
जवाहरनगर : कडक उन्हाळा सुरू होताच वेध लागतात ते आंब्याच्या रसाचे. याच काळात लग्न समारंभ होत असल्याने पाहुण्यांना आंबाच्या रसाचा पाहुणचार करण्याची प्रथा होती. ग्रामीण भागात गावरान वाणाचा आंब्याचा रस म्हणजे पर्वणी ठरत असे. मात्र कालौघात बेसुमार प्रमाणात झालेली वृक्षतोड व जळाऊ लाकूड म्हणून होत असलेला वापर यामुळे ग्रामीण भागातून आमराई नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
ग्रामीण संस्कृतीचा एक अंग असलेला गावरान आंबा व रस आता दुर्मिळ झाला आहे. सासरी गेलेली मुलगी वर्षातून दोन वेळा माहेरी येते, ते म्हणजे दिवाळी, भाऊबीज आणि अक्षयतृतीयानंतर आंब्याच्या रसाला. हा संस्कृतीचा एक भाग म्हणून आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असतानाच वृक्षतोडीने गावरान आंबा इतिहासजमा होत आहे.
ग्रामीण भागात असलेल्या अनेक आमराया या वृक्षतोडीने नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे आमराईत गप्पांची मैफल, आंब्याला बहर आला की त्याचा दुरवर पसरणारा सुगंध आता दुरापास्त झालेल्या दिसत आहेत. आंब्याच्या रसाचे निमित्त करून मुलीसोबत जावयांना बोलावून पुरणपोळी, यासह गावरान आंब्याचा रस, त्यावर खमंग तुपाची धार हा पाहूणचार विदर्भाची परंपरा राहिली आहे. ग्रामीण भागातील आंब्याचे प्रकारही अनेक प्रचलित होते. गावातील एखाद्या लहान मुलाला विचारले तरी तो अमूक झाडाचा आंबा गोड की आंबट हे निरखून सांगायचा. आमराईत पाडावरचे आंबे खाण्यासाठी मुलांची होणारी पळापळ, फांद्यावर टोळक्याने खेळायचा डाबडुबली आणि कडक उन्हात आंब्याच्या थंडगार सावलीत बसून रंगणाऱ्या गप्पा आता कालबाह्य झाल्या आहेत.
आंब्याच्या झाडांची कत्तल सुरु असल्यामुळे प्रतिष्ठेचे लक्षण समजल्या जाणाऱ्या आमराया दुर्मिळ झाल्या आहेत. पूर्वीच्या काळी आमराईवरुन श्रीमंती ठरत असे. आता मात्र कालौघात या बाबी लोप पावत आहेत. (वार्ताहर)
इंधनाकरिता होतो वापर
संगणकाच्या युगात आमराईत बसून गप्पा मारताना कुणी दिसत नाही. स्पर्धेच्या काळात पुस्तकाच्या ओझ्याखाली दबलेल्या विद्यार्थ्यांना तर डाबडुबली हा खेळ काय याची माहिती नसल्याने त्यातील गंमत हरवत आहे.