गॅस सिलिंडर धारकांंना आता केरोसीन बंद
By Admin | Updated: October 6, 2015 00:47 IST2015-10-06T00:47:49+5:302015-10-06T00:47:49+5:30
तालुक्यात व जिल्ह्यात दोन गॅस सिलिंडर जोडणी असलेल्या शिधापत्रिका धारकाला वार्षिक १२ गॅस सिलेंडर सवलतीच्या दरात अनुदेय आहे.

गॅस सिलिंडर धारकांंना आता केरोसीन बंद
अंमलबजावणी प्रारंभ : सिलिंडर्स धारकांची यादी मागविली
तुमसर : तालुक्यात व जिल्ह्यात दोन गॅस सिलिंडर जोडणी असलेल्या शिधापत्रिका धारकाला वार्षिक १२ गॅस सिलेंडर सवलतीच्या दरात अनुदेय आहे. त्याचबरोबर एक गॅस जोडणी शिधापत्रिका धारकासही वार्षिक १२ गॅस सिलेंडर सवलतीच्याच दरात मिळत आहे. यापुढे आता गॅस सिलिंडर धारकांना केरोसीन मिळणे शासन आदेशानुसार बंद करण्यात आले आहेत.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत ग्रामीण व शहरी भागाकरिता केरोसीनचे वितरण परिणाम राज्य शासनाने जून १९९७ पासून निश्चित केले होते. मात्र सदर परिणामामुळे ग्रामीण भागातील शिधापत्रिका धारकावर अन्याय होत आहे. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागाकरिता समान परिणाम ठरवावे, याकरिता सन १९९८ ला जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. परिणामी ३१ मार्च २००१ अन्वये शहरी व ग्रामीण भागाकरिता समान परिणाम निश्चित करण्यात आले होते. मात्र शासनाने सध्या निश्चित केलेल्या परिणामानुसार गरीब जनतेला केरोसीन मिळत नसल्याने उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात कवडू देवना पुंड यांनी सन २०१४ ला जनहित याचिका दाखल केली होती.
त्याप्रकरणी १ जुलै २०१५ ला उच्च न्यायालयच्या नागपूर खंडपीठाने केरोसीन वितरणाच्या परिणामात सुधारणा करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शासनाने शहरी व ग्रामीण भागासाठी वेगवेगळे असलेले केरोसीन वाटपाचे परिणाम रद्द करून आता शहरी व ग्रामीण भागातील गरीब तसेच बिगर शिधापत्रिका धारकासाठी एक रुप परिणाम निश्चित करण्यात आला आहे. शिधापत्रिकेवरील व्यक्तींची संख्या विचारात घेऊन केरोसीनचे वितरण करण्यात येणार आहे.
त्यात एक व्यक्ती असल्यास २ लिटर केरोसीन, दोन व्यक्ती असल्यास तीन लिटर केरोसीन व तीन व्यक्ती व त्याहून अधिक व्यक्ती असल्यास चार लिटर केरोसीन देण्यात येणार आहे. त्यामुळे नक्कीच गरीब तसेच बिगर सिलिंडर गॅसधारकांना 'अच्छे दिन' आले असे म्हणावे लागेल.
आज आधुनिक युगात आदिवासी बांधवांना तसेच मागासवर्गीय गरीबांकरिता वनाचे रक्षण व्हावे म्हणून एलपीजी गॅसचे वितरण शासन स्तरावरून होत असताना कित्येक ग्रामीण लाभार्थी असे आहेत की, त्यांच्याकडे एकदा गॅस सिलेंडर रिकामा झाला की दुसऱ्यांदा गॅस रिफील करण्याइतपत कुवत नाही. त्यामुळे आजही ते जळावू लाकडांचा स्वयंपाकाकरिता उपयोग करतानाचे वास्तव्य ग्रामीण भागात आहे. परिणामी अशा गोरगरीबांच्या शिधापत्रिकेवर सिलिंडरगॅसधारक असल्याची नोंद असल्याने त्यांनाही केरोसीनला मुकावे लागणार आहे.
एकट्या तुमसर शहरात आठ हजार नागरिक एक किंवा दोन सिलिंडर गॅस धारक आहेत. तुमसर तालुक्यात २५ हजारांच्या घरात सिलिंडरगॅस धारक आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच चालली असल्यामुळे केरोसीन गरजू लाभार्थ्यांना न मिळता केरोसीन विक्रेत्याकडेच शिल्लक राहणार असल्याने केरोसीन विक्रेत्यांना ते फावणार आहे, एवढे मात्र निश्चित. (शहर प्रतिनिधी)
शासन निर्णयानुसार गॅस धारकांची यादी मागविणे सुरु आहे. शहरी व ग्रामीण भागात केरोसीनचे समान परिणामाकरिता या महिन्यात केरोसीनचे नियतनही वाढवून मिळाले.
- एस.एच. लोहारे
पुरवठा निरीक्षक, तुमसर.