पर्यटनवाढीसाठी कोका वनविभागाने फुलविला बगिचा
By Admin | Updated: December 28, 2015 00:46 IST2015-12-28T00:46:03+5:302015-12-28T00:46:03+5:30
कोका येथे पर्यटक आले पाहिजेत, ते थांबले पाहिजेत. पर्यटन वाढीतून रोजगार व स्वयंरोजगार निर्मितीला चालना मिळाली पाहिजे.

पर्यटनवाढीसाठी कोका वनविभागाने फुलविला बगिचा
शुभवर्तमान : वन अधिकाऱ्याने सुरू केले स्वप्रेरणेतून काम
युवराज गोमासे करडी (पालोरा)
कोका येथे पर्यटक आले पाहिजेत, ते थांबले पाहिजेत. पर्यटन वाढीतून रोजगार व स्वयंरोजगार निर्मितीला चालना मिळाली पाहिजे. त्यातून बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, या उद्देशाने कोका वन विभागाने शासकिय निधीची वाट न पाहता, कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून वनविभाग कार्यालय परिसरात सुंदर बगिचा तयार केला आहे.
सन २०१३ मध्ये कोका वन्यजीव अभयारण्याची निर्मिती झाली. या अभयारण्यात वाघ, बिबट, हरिण, अस्वल, सांबर, मोर, रानकोंबडी, भेकरु, नीलगाय, चितळ, अस्वल, रानम्हशी, रानकुत्रे यासह प्राणी मोठ्या संख्येने आहेत. पर्यटक या भागात भेटी देतात. परंतू त्यांच्या विश्रामाचे प्रमाण कमी आहे. जैवविविधतेने नटलेला परिसर असतानाही त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन काहीसा निराशाजनक होता. प्र्रादेशिक वनकार्यालयाची दुरवस्था झाली होती. सामान्यांनाही बसायची इच्छा होत नव्हती. दुरावस्थेची स्थिती पालटून निसर्गरम्य स्थळ निर्माण करावे, अशी कल्पना कोका वनविभागाचे क्षेत्र सहायक डब्ल्यू. आर. खान यांनी मांडली. त्यानंतर त्यांनी शासकीय निधीची वाट न पाहता स्वयंपे्ररणेतून बगिच्याची निर्मिती केली. कोका अभयारण्यात पर्यटनानिमित्त येणाऱ्या व वन विश्रामगृहात थांबणाऱ्या पर्यटकांना निसर्ग पर्यटनाबरोबर अल्हाददायक वातावरण मिळावा, यासाठी त्यांनी बगिच्यात जासवंद, शेवंती, गिल्हाडी, क्रोटनची फुलझाडे, रंगीबेरंगी मेंहदी, मोगरा, चितावर आदी फुलझाडांची लागवड केली. बगिच्यामुळे वनक्षेत्र सहायकांच्या कार्यालयाच्या सौंदर्यात भर पडली आहे. गावात येणाऱ्या-जाणाऱ्यांचे हा बगिचा लक्ष वेधून घेत आहे. बगिच्यासाठी पालोरा, भंडारा येथून फुलझाडे खरेदी करण्यात आली. वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्रसहायक डी. एस. मारबते यांच्या कार्यालयासमोरील बगिचातील कलमांचाही वापर करण्यात आला. वनमजूर व्ही.डी. डोंगरे, मारोती आगासे, केवळराम वलके यांनी यासाठी सहकार्य केल्याचे खान यांनी सांगितले. कोका ग्रामपंचायत व वनविभाग कार्यालयाने प्रेरणा घेऊन नवनिर्माणाचे कार्य केल्यास पर्यटन वाढीसाठी मदत होऊ शकते.
पर्यटक वाढीस चालना आणि स्वयंरोजगाराची संधी मिळावी, त्याचबरोबर विश्रामगृहात थांबणाऱ्यांना आल्हाददायक वातावरण मिळावे, या हेतूने बगिच्याची निर्मिती वन मजुरांच्या सहकार्याने केली. यासाठी शासकिय निधी व लोकवर्गणी जमा करण्यात आली नाही. स्वयंपे्ररणेने काम हाती घेण्यात आले.
- डब्ल्यू. आर. खान,
क्षेत्र सहायक वनविभाग कोका