जिल्हाधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांची शहर स्वच्छतेसाठी ‘गांधीगिरी’

By Admin | Updated: November 1, 2014 22:47 IST2014-11-01T22:47:13+5:302014-11-01T22:47:13+5:30

‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’ असा मुलमंत्र रामदास स्वामींनी दिला होता. त्यानुसार दुसऱ्यांना उपदेश करण्यापेक्षा स्वत: ते कार्य करून दाखवावे, या ध्येयामुळे जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे

'Gandhigiri' for cleanliness of the officials of the district collectors | जिल्हाधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांची शहर स्वच्छतेसाठी ‘गांधीगिरी’

जिल्हाधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांची शहर स्वच्छतेसाठी ‘गांधीगिरी’

भंडारा : ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’ असा मुलमंत्र रामदास स्वामींनी दिला होता. त्यानुसार दुसऱ्यांना उपदेश करण्यापेक्षा स्वत: ते कार्य करून दाखवावे, या ध्येयामुळे जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी पालिका प्रशासनासह आज शनिवारला गांधी चौक परिसरात हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानात सहभागी झाल्या. या मोहिमेत नगराध्यक्ष बाबूराव बागडे यांच्यासह पालिका पदाधिकारी, नगरसेवक, मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी, कर्मचारी व नागरिक सहभागी होऊन उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
रामधुनपूर्वी गावपूर्ण ।
व्हावे स्वच्छ सौंदर्यवान ।।
कोणाही घरी गलीच्छपणं ।
न दिसावे ।।
काहिंनी सांडपाणी साचविले ।
मच्छर जंतू अति वाढले ।।
रोगराईने बेजार झाले ।
शेजारी सगळे ।।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतील ओव्यांमधून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला. मात्र, राष्ट्रसंतांनी दिलेल्या संदेशाला नागरिकांकडूनही प्रतिसाद मिळत आहेत. महात्मा गांधी जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत ही संकल्पना साकारण्यासाठी स्वत: हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा संदेश दिला होता. त्यानंतर देशभरात स्वच्छता अभियान शासकीय, निमशासकीय कार्यालयासह स्थानिक स्वराज्य संस्थेत राबविण्यात येत आहे.
भंडारा नगरपालिका प्रशासनाने या स्वच्छतेच्या या हाकेला साद देत शहरातील प्रत्येक वॉर्डात स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन केले आहे. या अभियानात जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना उपदेश देण्याऐवजी स्वत: हातात झाडू घेऊन शहरातील सफाई अभियानात सहभाग घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी हातात झाडू घेऊन सफाई करण्यास सुरूवात करताच उपस्थित उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिल्लारी, नगराध्यक्ष बाबुराव बागडे, पालिका मुख्याधिकारी रविंद्र देवतळे, उपाध्यक्ष कविता भोंगाडे, सभापती नितीन गायधने, सभापती शमिन शेख, नगरसेवक महेंद्र गडकरी, नगरसेवक अ‍ॅड. विनय पशिने, मिलींद मदनकर, हिवराज उके, माधुरी चौधरी, हाजी अखरी बेगम, महेंद्र निंबार्ते, मधुरा मदनकर यांच्यासह पालिकेचे अभियंता, कर्मचारी व सर्व कामगार व परिसरातील नागरिकांनीही हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानात स्वयंस्फुर्तीने सहभाग घेतला.
नियमित कामगारांखेरीज शहराची स्वच्छता करण्यासाठी ३० अतिरिक्त कामगार कामावर लावले आहे. दररोज दोन प्रभागाची स्वच्छता करण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्वांनी चार तास श्रमदान करून परिसर स्वच्छ केला. यावेळी सर्वांनी मार्ग स्वच्छ करण्यासोबतच नाल्यांची सफाई करून झाडेझुडपे तोडून परिसर स्वच्छ करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 'Gandhigiri' for cleanliness of the officials of the district collectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.