करडी ग्रामपंचायतवर मोर्चा
By Admin | Updated: July 1, 2014 23:20 IST2014-07-01T23:20:34+5:302014-07-01T23:20:34+5:30
येथील ग्रामपंचायत कार्यालयावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व ग्रामस्थांच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात मंगळवार रोजी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळून मोर्चा काढण्यात आला.

करडी ग्रामपंचायतवर मोर्चा
करडी (पालोरा) : येथील ग्रामपंचायत कार्यालयावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व ग्रामस्थांच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात मंगळवार रोजी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळून मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांच्या निराकरणासाठी तरुणांचा दबाव वाटताच ग्रामप्रशासन झुकले. सर्व समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.
दुपारी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळून निघालेला मोर्चा गावातून घोषणा देत ग्रामपंचायत कार्यालयावर धडकला. दुपारी ३ वाजेपर्यंत विविध मुद्यांवर तरुणांनी आक्रमक भूमिका घेतली. मागण्यांवर उत्तरे मिळाल्याशिवाय हटणार नाही अशी भूमिका तरुणांनी घेताच प्रशासन झुकले. मागण्या मंजुरीचे लेखी आश्वासन दिले. लेखी आश्वासनामध्ये नवीन जलवाहिनीची गळती काढण्याचे काम सुरु आहे. जर प्रश्न सुटला नाही तर जुन्या जलवाहिनीवरून पाण्याचा पुरवठा करण्यात येईल. ९ जुलै रोजी दुपारी १२ वाजता ग्रामसभा घेण्यात येईल. पाणी पुरवठा पाईप लाईनद्वारे दूषित पाणी पुरवठा होत आहे.
कोणत्याही परिस्थितीत ग्रामपंचायतीला नवीन पाईप लाईन हस्तांतरीत करण्यात येणार नाही. कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल. दुषित पाण्याची समस्या सुटेपर्यंत नळाचे पाणी पिण्यात येणार नाही. टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा उद्या दि. २ जुलै पासून करण्यात येईल आदी विविध मागण्यांवर लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश इलमे यांनी केले. यावेळी दिलीप साठवणे, मुकेश आगाशे, कुसन बांते, निखील बांते, गुणवंत भडके, वासुदेव कदम, राजेंद्र कानतोडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिस व महसूल विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. (वार्ताहर)