भयभीत कुटुंबाने गाव सोडले
By Admin | Updated: October 13, 2014 23:17 IST2014-10-13T23:17:29+5:302014-10-13T23:17:29+5:30
तुमसर शहरापासून अवघ्या पाच कि़मी. अंतरावरील मिटेवानी येथे एका कुटूंबाला जादूटोना केल्याच्या आरोपावरून गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे. संपूर्ण कुटूंब सध्या भयभीत असून ते दुसऱ्या

भयभीत कुटुंबाने गाव सोडले
मिटेवानी येथील घटना : अंधश्रध्देतून घडला प्रकार
तुमसर : तुमसर शहरापासून अवघ्या पाच कि़मी. अंतरावरील मिटेवानी येथे एका कुटूंबाला जादूटोना केल्याच्या आरोपावरून गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे. संपूर्ण कुटूंब सध्या भयभीत असून ते दुसऱ्या गावी नातेवाईकांकडे राहत आहेत. यात काहींनी मध्यस्थीची भूमिका वठविली होती, परंतु ते प्रयत्न निष्फळ ठरले.
तुमसर-बालाघाट आंतरराज्यीय महामार्गावर तुमसर शहरापासून अवघ्या पाच कि़मी. अंतरावर मिटेवानी गाव आहे. शंकर गोरबडे यांच्या घरापासून काही अंतरावर दुसरे कुटूंब राहते. त्यांची १७ ते १८ वर्षाची मुलगी सतत आजारी आहे. आजारात ती बडबडून शंकर गोरबडे यांचे नाव घेते. शंकर गोरबडे यांनीच आपल्या मुलीला भूतबाधा केली असा आरोप त्या कुटूंबाने गोरबडे यांच्यावर करून शाब्दिक वाद घातला. मागील एक ते दीड महिन्यापासून हे प्रकरण सुरू आहे. गावातील प्रतिष्ठीतांनी आरोप करणाऱ्या कुटूंबाला मुलीला रुग्णालयात घेवून जाण्याचा सल्ला देवून मध्यस्थी केली होती. मुलीला कुटूंबीयांनी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करून एक दिवस उपचार केला. त्यानंतर मुलीला गावाला परत घेवून आले. पुन्हा ती तशीच बडबड करीत आहे. या दरम्यान भितीने गोरबडे कुटूंबाने गाव सोडून दुसऱ्या गावाचा आश्रय घेतला आहे. किती दिवस गावाबाहेर दुसऱ्याकडे राहावे, असा प्रश्न गोरबडे यांना पडला आहे.दोन दिवसापुर्वी गोरबडे यांची १२ वीत शिकणारी मुलगी मिटेवानी येथे घरी अभ्यासाची पुस्तके घेण्याकरिता गेली असता गावातील काही तरूण टवाळखोरांनी जादूटोण्याच्या संदर्भात हटकले होते. सदर प्रकरणात अनुचित प्रकार घडू नये याकरिता गावातील समााजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)