दिल्लीतील महाराष्ट्र सदनात यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना मोफत निवास व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:39 IST2021-08-25T04:39:42+5:302021-08-25T04:39:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भुयार : नवी दिल्ली येथील प्रसिद्ध महाराष्ट्र सदनात संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ...

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना मोफत निवास व्यवस्था
लोकमत न्यूज नेटवर्क
भुयार : नवी दिल्ली येथील प्रसिद्ध महाराष्ट्र सदनात संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क आकारणी न करता अंतिम मुलाखतीसाठी व मुलाखतीपूर्व मॉक टेस्टसाठी तसेच वैद्यकीय चाचणीसाठी दिल्ली येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत निवास व्यवस्था द्यावी, अशी मागणी भंडारा येथील माजी न्यायाधीश तथा सामाजिक कार्यकर्ते ॲड. महेंद्र गोस्वामी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे केली होती. ही मागणी मान्य झाल्याचे पत्र व जीआर नुकतेच प्राप्त झाले असून यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील व खेड्यापाड्यातील विद्यार्थी व पात्र उमेदवार संघ लोकसेवा आयोगाची लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी दिल्ली येथे जातात. तसेच मुलाखतीपूर्वी मॉक टेस्टसाठी व मुलाखती नंतर वैद्यकीय चाचणीसाठी देखील विद्यार्थ्यांना जावे लागते; परंतु अशा पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र सदनात राहण्यासाठी नियमानुसार प्रतिदिन ५०० रुपये भाडे मोजावे लागत होते. त्यामुळे अशा गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत होती. त्यांच्या हक्काच्या महाराष्ट्र सदनात मोफत निवास व्यवस्था नसल्यामुळे दिल्लीत त्यांची फरकड होत होती. महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेला अध्यादेश महाराष्ट्रातील यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना अन्यायकारक आहे व हा जीआर मागे घेण्यात यावा व महाराष्ट्र सदनात यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना मोफत निवास व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी ॲड. महेंद्र गोस्वामी यांनी केली होती.
या मागणीची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली असून यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सदनात मोफत ७ दिवस निवास व्यवस्था केली जाईल, असा नवीन अध्यादेश महाराष्ट्र शासनाने निर्गमित केला असून पूर्वीचा जीआर रद्द केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करून महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत.