सवलतीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 05:00 IST2021-10-09T05:00:00+5:302021-10-09T05:00:43+5:30
वाहन खरेदी करणाऱ्याला दहा ते वीस हजार रुपयांपर्यंत प्रत्येक वाहन खरेदीवर सवलती आम्हीच देत आहोत. असे ग्राहक जे वाहन रोखीने खरेदी करू इच्छितात, अशा ग्राहकांना हे टारगेट बनवत आहेत. ज्या फाॅर्मवर ग्राहकांच्या स्वाक्षरी घेतात, वास्तविक ते फायनान्स कंपनीचे करारपत्र असतात. याबाबत बऱ्याच ग्राहकांना माहिती नसते आणि येथेच सर्व फसले जातात.

सवलतीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक
संतोष कोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : जिल्ह्यामध्ये नवीन दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना नेटवर्कच्या माध्यमातून तयार करून प्रत्येक दुचाकीवर दहा ते वीस हजार रुपयांची सवलत दाखवून गाडी विकून नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांना फसविण्याचा गोरखधंदा पुन्हा सुरू झाला आहे. जिल्ह्यात पुन्हा नेटवर्क सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये फायनान्स कंपनीचे कर्मचारी, एजंट व शोरूममधील कर्मचारी या तिकडींचा समावेश असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नवीन वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत आहे.
दोन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती भंडारा जिल्ह्यात होत असून, भंडारा येथे बोगस कंपन्या बनवून काही लोक शोरूमचे कर्मचारी, फायनान्स कंपनीचे कर्मचारी व या बोगस कंपनीचे एजंट यांच्यामार्फत हा व्यवहार करीत आहेत.
वाहन खरेदी करणाऱ्याला दहा ते वीस हजार रुपयांपर्यंत प्रत्येक वाहन खरेदीवर सवलती आम्हीच देत आहोत. असे ग्राहक जे वाहन रोखीने खरेदी करू इच्छितात, अशा ग्राहकांना हे टारगेट बनवत आहेत. ज्या फाॅर्मवर ग्राहकांच्या स्वाक्षरी घेतात, वास्तविक ते फायनान्स कंपनीचे करारपत्र असतात. याबाबत बऱ्याच ग्राहकांना माहिती नसते आणि येथेच सर्व फसले जातात.
भंडारा शहर हे सर्व शासकीय कार्यालयाचे मुख्यालय असून सुद्धा या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा व आर्थिक गुन्हे शाखेचे कार्यालय असून सुद्धा यांच्या चाणाक्ष नजरेतून हे रॅकेट कसे का सुटले, याबाबत सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
या बोगस कंपन्यांच्या जाळ्यामध्ये साकोली येथील शासकीय कर्मचारी, व्यापारी, दुकानदार तसेच लहान-मोठे ग्राहक यांच्या जाळ्यात फसले असून, आता त्यांना पश्चात्ताप करायची वेळ आली आहे. मागील एक वर्षापासून परत हे रॅकेट दुसऱ्या बोगस एजंटांनी सुरू केले असून, हे रॅकेट सुद्धा नवरात्र व दिवाळी उत्सवाच्या नावाखाली जनतेची दहा ते वीस हजारांची सवलत दाखवून चुना लावण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
काय सांगितले जाते ग्राहकांना
ग्राहकांना सांगतात की, तुम्हाला आम्ही फायनान्स करून देत आहोत. तुम्हाला सुरुवातीचे सहा हप्ते भरावे लागतील. त्यानंतर आम्ही सर्व रक्कम एक मुफ्त फायनान्स कंपनीला भरून देऊ. दोन ते चार महिन्यांनी फायनान्स कंपनीकडून त्यावर एनओसी किंवा नाहरकत प्रमाणपत्र मिळून जाईल. परंतु, मागील एक वर्षापासून सुरू असलेल्या या गटांकडून आतापर्यंत पंधरा-वीस ग्राहकांनाच नाहरकत प्रमाणपत्र फायनान्स कंपनीकडून देण्यात आलेले आहे. परंतु, उर्वरित ८० ते ९० टक्के ग्राहक नाहरकत प्रमाणपत्र फायनान्स कंपनीकडून आपल्याला मिळेल, या आशेवर आहेत.
दोन वर्षांपूर्वीही असाच प्रकार
यापूर्वीही अशाच प्रकारचे आमिष दाखवून वाहन विक्री करणाऱ्यांची टोळी दोन वर्षांपूर्वी भंडारा व गोंदिया येथे सक्रिय होती. या टोळीने दोन वर्षांपूर्वी कोट्यवधींची फसवणूक करून शेवटी पोबारा केला होता. याबाबत लाखनी पोलीस स्टेशन व गोंदिया तथा गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात ४०६, ४२०, ४६८, ४७१, ३४ अशा विभिन्न कलमाखाली काहींवर गुन्हे दाखल आहेत.
सणासुदीचा काळ आहे. अशा ग्राहक नवीन वाहन खरेदी करण्यास इच्छूक असल्यास त्यांनी थेट व्यापारी प्रतिष्ठानाशी संपर्क करावा. कुठल्याही बनावट एजंटाच्या फसवुणकीला बळी पडता कामा नये. असा प्रकार लक्षात येताच थेट पोलीस ठाणे, कंट्रोल रूम किंवा डायल ११२ चा वापर करून माहिती द्यावी. नागरिकांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये.
-वसंत जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा.