नव्या कोऱ्या पुस्तकांचा सुगंध दरवळणार
By Admin | Updated: June 25, 2014 00:14 IST2014-06-25T00:14:22+5:302014-06-25T00:14:22+5:30
स्मरणात राहणारा शाळेचा पहिला दिवस सुखद क्षण घेऊन येणार आहे. नवविद्यार्थ्यांचे स्वागत होईल. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांच्या वर्गावर्गात सगळ्या मुलांना समारंभपूर्वक पुस्तकांचे वाटप केले जाईल.

नव्या कोऱ्या पुस्तकांचा सुगंध दरवळणार
‘स्वीट डीश’ : शाळेचा पहिला दिवस किलबिलणार
राजू बांते - मोहाडी
स्मरणात राहणारा शाळेचा पहिला दिवस सुखद क्षण घेऊन येणार आहे. नवविद्यार्थ्यांचे स्वागत होईल. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांच्या वर्गावर्गात सगळ्या मुलांना समारंभपूर्वक पुस्तकांचे वाटप केले जाईल. किलबिलणारी मुलं व त्यांच्या हातात असणाऱ्या नव्या कोऱ्या पुस्तकांचा सुगंध शाळा परिसरात पसरणार आहे.
शैक्षणिक सत्र २०१४ - २०१५ तील शाळेचा पहिला दिवस २६ जून गुरुवार रोजी सुरु होत आहे. दुसऱ्या इयत्तेत जाणाऱ्या मुलांसाठी शाळा नवीन राहणार नाही. पण पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळा, शाळेचा परिसर, अध्यापन करणारे गुरुजी सगळेच काही नवीन असणार आहे. असा संस्मरणीय क्षण विद्यार्थ्यांस अनुभवास येणार आहे. १०० टक्के विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी शाळेत उपस्थित झाले पाहिजेत. यासाठी १५ जून ते २५ जून पर्यंत शिक्षकांनी शाळापूर्व तयारी आणि पूर्व दिनी घरभेटी, शैक्षणिक पदयात्रेचे नियोजन केले आहे. शिक्षक मंडळी प्रवेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत.
पहिल्यांदाच शाळेमध्ये पाऊल ठेवणारी मुले दुसऱ्या दिवशीपासून नियमितपणे शाळेत यावीत याची काळजी शिक्षक घेणार आहेत. एक ते आठवीपर्यंतची शाळा पहिल्याच दिवशी गजबजेल यासाठी शिक्षकांनी पालक, विद्यार्थ्यास घरभेटी, पालकास पत्र देऊन जागृती केली आहे. मोहाडी तालुक्यातील १ ते ८ च्या शाळा विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत. शाळेत सडा टाकून रांगोळी काढावी, आंब्यांच्या पानांची आणि फुलांची तोरणे बांधून शाळा सुंदर सुशोभित करावी असे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कळविले आहे. शाळेचा प्रारंभ उत्साह, आनंद आणि चैतन्याने करण्यासाठी शैक्षणिक पदयात्रेत शिक्षणाधिकारी प्राथमिक, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुख यांनी नियोजनपूर्वक सहभागी होऊन विद्यार्थ्यांना, पालकांना प्रेरणा द्यायची आहे. शाळेचा पहिला दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात यावा, प्रात: ७ वाजता सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहायचे आहे. प्रभातफेरी काढण्यात यावी तसेच विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके दिली जावीत असे शिक्षण संचालक (प्राथ.) पुणे यांचे निर्देश आहेत. मोहाडी तालुक्यातील शाळांसाठी १६ हजार ४८१ मुलांना पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. २६ तारखेसाठी नवी कोरी पुस्तके विद्यार्थ्यांच्या हातात पडण्यासाठी प्रतीक्षा करीत आहेत. शाळेचा प्रथम दिवसाचा आनंद, विद्यार्थ्यांशी होणारी भेट, होणारी मैत्री, कोऱ्या पुस्तकांतून निघणारा सुगंध, जोश, उत्साह, संस्मरण व पहिल्या दिवशीचा किलबिलाट फलदायी होण्यासाठी शिक्षक आतूर झाली आहेत.