चौरास भागात धानपीक संकटात

By Admin | Updated: October 5, 2015 01:03 IST2015-10-05T01:03:22+5:302015-10-05T01:03:22+5:30

ऐन पावसाळ्यात जरी पावसाने वेळोवेळी हजेरी लावली असली तरी, परतीच्या पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा होता.

In the fourth part of the paddy crisis | चौरास भागात धानपीक संकटात

चौरास भागात धानपीक संकटात

पावसाने दिला दगा : वीज मंडळाचाही अनियमित पुरवठा
कोंढा (कोसरा) : ऐन पावसाळ्यात जरी पावसाने वेळोवेळी हजेरी लावली असली तरी, परतीच्या पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा होता. मात्र, पावसाने पाठ फिरविल्याने हातचे धान पीक जाण्याची भीती निर्माण झाली आहे. निसर्गासोबतच वीज वितरण कंपनीनेही शेतकऱ्यांची बोळवण सुरू केली आहे. भारनियमनाच्या नावावर आठ तासदेखील वीज मिळत नसल्याने कृषी पंपधारक शेतकरी चिंतातुर झाला आहे.
चौरास भागातील शेतकऱ्यांचे धान पीक मुख्य आहे. मागील तीन वर्षापासून या परिसरात दुष्काळ पडत आहे. यावर्षी देखील पाऊस अत्यल्प पडल्याने चुऱ्हाड, विरली (खं.), पिंपळगाव (नि.), सोमनाळा भागात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. कोंढा परिसरात २३ सप्टेंबरला पाऊस पडला होता. तेव्हापासून पाऊस बेपत्ता झाला आहे. वातावरणात उकाडा वाढला आहे. पाऊस बेपत्ता झाल्याने जमिनी कोरड्या पडल्या आहेत. हलक्या धानाला पुन्हा पावसाची गरज आहे. परतीच्या पावसाची गरज आहे. कोंढा चौरास भागावर आधीच निसर्गाची अवकृपा झाली असताना विजेच्या समस्या वाढल्या आहेत. दररोज फक्त आठ तास थ्री फेस लाईन कृषी पंपधारकांना दिली जात आहे. त्या दरम्यान अनेकदा अनियमिततेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कृषी पंपधारक शेतकरी देखील शेतीला पंपाद्वारे पाणी पुरवठा योग्य प्रमाणात करू शकत नाही. तसेच विजेचे खांब ठिकठिकाणी चुकले असून केबल खराब झाले आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात धानाला पाणी पुरवठा होत नाही.
थ्री फेज वीज येणे जाणे वाढले असल्याने कृषी पंप धारक शेतकरी योग्य पाणीपुरवठा करू शकत नाही. त्यामुळे त्यांचे धानपिक नष्ट होत आहे. कोंढा परिसरात डावा कालव्यात पाणी सोडल्याने कालव्याच्या आजूबाजूचे शेकडो शेतकरी इंजिनच्या माध्यमातून शेतीला पाणी देऊन धानपिक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. यावर्षी अपुऱ्या पावसामुळे परिसरातील तलाव, नाले, बोड्या पूर्णपणे भरले नाही. त्यामुळे तलावाच्या बाजूचे शेतकरी तलावाचे पाणी देऊ शकत नाही. अशा अडचणीत शेतकरी सापडला आहे.
शेतकरी धानाचे पीक वाचविण्यासाठी धडपड करीत आहे. धानावर किडींचा प्रादुर्भाव आहे. यावर कोणताच उपाय नाही. लोकांनी दोन तीन वेळा फवारणी करून पिकांना संजीवनी देण्याचा प्रयत्न केला. पण काही उपयोग नाही असे दिसते. अशावेळी प्रशासनाने कोंढा चौरास भागाच्या शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: In the fourth part of the paddy crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.