आठ किलो चांदीच्या दागिन्यांसह चार तोळे सोने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:38 IST2021-03-09T04:38:17+5:302021-03-09T04:38:17+5:30
भंडारा : ज्वेलर्स दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्याने ८ किलो चांदीच्या दागिन्यांसह ४ तोळे सोने लंपास केल्याची घटना येथील ...

आठ किलो चांदीच्या दागिन्यांसह चार तोळे सोने लंपास
भंडारा : ज्वेलर्स दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्याने ८ किलो चांदीच्या दागिन्यांसह ४ तोळे सोने लंपास केल्याची घटना येथील खात रोडवर रविवारी उघडकीस आली. चोरट्यांनी ३ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असून श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.
अजय भास्कर डुंभरे, रा.वार्को सिटी भंडारा यांचे खात रोडवर डुंभरे ज्वेलर्स आहे. शनिवारी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद केले. रविवारी सकाळी त्यांना फोनवर दुकान उघडे असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी त्यांनी तात्काळ दुकान गाठले तेव्हा चोरी झाल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती भंडारा पोलिसांना देण्यात आली. चोरट्यांनी पाच किलो चांदीच्या पायपट्ट्या, दोन किलो चांदीचे जोडवी आणि एक किलो चांदीचे शिक्के तसेच एक ग्रॅम सोन्याच्या पाॅलिशचे ४० मंगळसूत्र आणि नेकलेस असा एकूण ३ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे लक्षात आले.
भंडारा शहर ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक रजनी तुमसरे आपल्या पथकासह या ठिकाणी दाखल झाल्या. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली. चोराचा माग शोधण्यासाठी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. मात्र उपयोग झाला नाही. दुसऱ्या दिवशीही चोरट्यांचा ठावठिकाणा पोलिसांना लागला नव्हता. अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर ही चोरी झाल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या चोरीचा तपास ठाणेदार लोकेश कानसे यांच्या मार्गदर्शनात केला जात आहे. चोरट्यांना लवकरच जेरबंद करु असे त्यांनी सांगितले.