Food poisoning in Jharp | झरप येथे अन्नातून ७० जणांना विषबाधा

झरप येथे अन्नातून ७० जणांना विषबाधा

ठळक मुद्देहळदीचे भोजन : उपचार सुरु, सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर (चौ.) : मुलीच्या लग्नानिमित्त आयोजित हळदीच्या जेवणातून तब्बल ७० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार लाखनी तालुक्यातील झरप येथे बुधवारी उघडकीस आला. सर्वांना मुरमाडी आणि आसगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विषबाधा झालेल्यांमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचा समावेश आहे.
झरप येथील जयराम कोरे यांच्या मुलीचे लग्न बुधवारी आसगाव येथील जागेश्वर तरोणे यांच्या मुलासोबत वरमंडपी आसगाव येथे आयोजित होते. त्यानिमित्त झरप येथे मंगळवारी रात्री हळदी कार्यक्रमाचे भोजन आयोजित करण्यात आले होते. गावातील अनेकांनी येथे भोजन केले. दरम्यान बुधवारी सकाळी ८ वाजतापासून पोटदुखी, उलटी आणि संडासचा त्रास काही जणांना होऊ लागला. त्यांना तात्काळ मुरमाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. सायंकाळपर्यंत येथे ३७ रुग्णांना दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी डॉ.मरसकोल्हे आणि पथक या सर्व रुग्णांवर उपचार करीत आहेत. मुरमाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात विलास मधुकर कोरे (१७), देवा देवीदास दोनोडे (१९), सागर ज्ञानेश्वर कोरे (२०), विजया ज्ञानेश्वर कोरे (३०), मुकुंदा रामदास बावणे (३५), तुकाराम नामदेव भेंडारकर, धीरज तुकाराम भेंडारकर, बनाबाई दुर्योधन तरोणे, चंद्रशेखर दादाराम भेंडारकर आदींवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान काही जण आसगाव येथे आयोजित लग्नसोहळ्यात सहभागी होण्यासाठी गेले होते. तेथे बुधवारी दुपारच्या वेळेस त्रास सुरु झाला. त्यामुळे त्यांना आसगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिथे ३० जणांवर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले. तर काही जण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

लग्नाच्या आनंदावर विरजण
हळदीच्या कार्यक्रमात विषबाधेचा प्रकार घडल्याने कोरे आणि तरोणे कुटुंबियांच्या आनंदावर विरजण पडले. दरम्यान बुधवारी सायंकाळी अत्यंत साधेपणात हा लग्नसोहळा आसगाव येथे पार पडला.

मुरमाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या ३७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. उलटी, पोटदुखी आणि संडासचा सर्वांना त्रास होत आहे. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
-डॉ.एस.एस. मरसकोल्हे, वैद्यकीय अधिकारी, मुरमाडी

Web Title: Food poisoning in Jharp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.