समाजजागृतीचे माध्यम ठरली लोककला ‘दंडार’
By Admin | Updated: December 10, 2015 00:49 IST2015-12-10T00:49:50+5:302015-12-10T00:49:50+5:30
पौराणीक काळात दंडार, नकला, संगीत नाटक व पोवाळा हे मनोरंजनाचे महत्त्वाचे साधन होते. आधुनिकतेमुळे यांत्रिक युगात हे साधने कालबाह्य होत असले तरी,

समाजजागृतीचे माध्यम ठरली लोककला ‘दंडार’
नितेश किरणापुरे लवारी
पौराणीक काळात दंडार, नकला, संगीत नाटक व पोवाळा हे मनोरंजनाचे महत्त्वाचे साधन होते. आधुनिकतेमुळे यांत्रिक युगात हे साधने कालबाह्य होत असले तरी, साकोली तालुक्यातील लवारी येथील एका मंडळाने मागील १५ वर्षांपासून 'दंडार'च्या माध्यमातून समाज जागृती करण्याची परंपरा आजही जोपासली आहे.
लवारी येथील काही धेय्यवेडे युवक एकत्र आलेत. समाजात घडत असलेली अंधश्रध्दा, मागासलेपणा व अशिक्षितपणाचा फटका यामुळे दैनिक जीवनात त्यांच्यावर येत असलेले संकट. यामुळे ते विचलीत होवून त्यांनी एका मंडळाची स्थापना केली. सुमारे १५ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या नवनीत दंडार मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अखंडीतपणे समाज जागृतीचे काम सुरू ठेवले आहे. या मंडळात गावातील सर्व समाजातील युवकांचा सहभाग आहे. मात्र, त्यांनी ज्या काळात दंडारीच्या माध्यमातून समाज जागृतीचा संकल्प केला. त्यावेळेस या युवकांना गावातील काहींनी हास्यात काढले.
मात्र, न डगमगता या युवकांनी समाज जागृतीचा संकल्पाला तडा जावू न देता दंडारींचा प्रयोग अविरत सुरूच ठेवला. युवकांच्या अंगात असलेल्या कलागुणांना त्यांनी दंडारीतून मोठा रंगमंच मिळवून दिला होता. रात्री उशिरा सुरू होत असलेला हा दंडारीचा कार्यक्रम संपूर्ण रात्रभर अखंडीत सुरू राहत असे. महत्त्वाचे म्हणजे, दंडीर हे मंडईच्या कार्यक्रमात ऐन कुडकुडत्या हिवाळ्यात ठेवण्यात येतात. यामुळे सहभागी कलावंत थंडीची तमा न बाळगता वेळप्रसंगी पात्रानुसार रात्री अर्धनग्नावस्थेत पात्रातून अभिनय साकारतात.
काही सधन तर काही मध्यम कुटुुंबातील हे युवक त्यांच्या घरातील सर्व कामे हातावेगळी झाल्यावर मिळालेल्या फावल्या वेळेत दंडारीतून त्यांच्या अंगातील कलागुण दाखवित आहेत. कालांतराने या मंडळाकडे ग्रामस्थ व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन मागील पाच वर्षापासून शासकीय लोकजागृतीचे काम त्यांच्या मंडळाकडे चालून येत आहेत. स्वच्छ भारत मिशन, स्त्रीभृ्रणहत्या, अंधश्रध्दा, हुंडाप्रथा, बालविवाह अशा एक ना विविध प्रकारावर आधारित नाटीका हे कलावंत दंडारीतून साकारीत आहेत. त्यांच्या या मोहिमेला समाजातील घटकही चांगला प्रतिसाद मिळत आहे. केवळ हौस म्हणून स्थापन केलेल्या मंडळाच्या माध्यमातून सुरू केलेली युवकांची ही दंडार पंचक्रोशित नावारूपास आली आहे. त्यांचे दंडारीचे प्रयोग बघताना, पौराणीक काळातील कला जीवंत ठेवण्यासाठी त्यांनी चालविलेला खटाटोप खरोखरचं वाखाणण्याजोगा आहे.