शिक्षणात अग्रक्रम देऊन मुलींच्या प्रगतीवर भर द्या
By Admin | Updated: August 11, 2016 00:29 IST2016-08-11T00:29:55+5:302016-08-11T00:29:55+5:30
महिलांनी सर्व क्षेत्रात प्रगती केल्यामुळे मुलींना ओझे न समजता त्यांना शिक्षणात अग्रक्रम देवून त्यांच्या प्रगतीवर भर द्या, ...

शिक्षणात अग्रक्रम देऊन मुलींच्या प्रगतीवर भर द्या
महिला सक्षमीकरण मेळावा : रामचंद्र अवसरे यांचे प्रतिपादन
भंडारा : महिलांनी सर्व क्षेत्रात प्रगती केल्यामुळे मुलींना ओझे न समजता त्यांना शिक्षणात अग्रक्रम देवून त्यांच्या प्रगतीवर भर द्या, असे प्रतिपादन आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले. उपविभागीय कार्यालय भंडाराच्या वतीने पोलीस बहुउद्देशिय सभागृहात महिला सक्षमीकरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
या कार्याक्रमास जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, उपविभागीय अधिकारी संपत खिलारी, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुधन सभापती नरेश डहारे, जिल्हा परिषद सदस्य कायते, आजबले, ज्योती खवास, पंचायत समिती सदस्य वर्षा साकुरे, लांजेवार, नागोसे, बांडेबुचे उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, महिलांनी योजना राबविणे व योजनांचा लाभ घेण्याकरीता स्वत: पुढाकार घेणे तसेच योजनांची माहिती गरजू लाभार्थ्यांपर्यत पोहचविणे आवश्यक आहे.
प्रस्ताविकात संपत खिलारी यांनी महिला सक्षमीकरण सप्ताहाच्या अनुषंगाने आतापर्यंत ३० गावांमध्ये महिला मेळावे आयोजित करण्यात आले. या मेळाव्यास महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लाभला, असे सांगितले. डॉ. कविश्वर यांनी महिलांचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले. पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा सेविकांनी भ्रुणहत्येवर नाटिका सादर केली. आशा सेविका व महिलांनी गीते व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
यावेळी जातीचे दाखले, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीय कुटूंब लाभ अर्थ सहाय्याचे धनादेश वाटप, राशनकार्ड, मतदार ओळखपत्र, तसे नगर परिषदमार्फत दिनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत १३ बचत गटांना प्रत्येकी १० हजाराचे धनादेश वाटप करण्यात आले. पचायत समितीमार्फत रमाई आवास योजनेंतर्गत ६ लाभार्थ्यांना धनादेश वितरीत करण्यात आले. समाज कल्याण विभागामार्फत मुलींना सायकल वाटप तसेच धारगाव येथील ४ महिला बचत गटांना अनुदान वाटप करण्यात आले. कृषी विभागामार्फत निविष्ठा वाटप व आदिवासी विकास विभागामार्फत राज्यस्तरीय क्रिडास्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडुंचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत १ लाख रुपयांचा धनादेश निशा राजू तिघरे यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. भंडारा तालुक्यातील पिंपळगाव व पवनीतील शेगाव येथील गावकऱ्यांना सामूदायिक वन हक्क पट्टयाचे वितरण करण्यात आले.
या अनुषंगाने समाजकल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, उपअधिक्षक भूमी अभिलेख, मतदार जनजागृती, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी, कृषी विभाग, राजीव गांधी जीवनदायी योजना तसेच विविध बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुंच्या प्रदर्शनी लावण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी जोगदंड, तहसिलदार संजय पवार, गटविकास अधिकारी मंजुषा ठवकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अडागळे उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)