अग्निशामकाला समस्यांच्या ज्वाला
By Admin | Updated: April 8, 2015 00:48 IST2015-04-08T00:48:01+5:302015-04-08T00:48:01+5:30
आग आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीला धावून येणारे भंडाऱ्यातील अग्निशामक दलच संकटात आहे. ..

अग्निशामकाला समस्यांच्या ज्वाला
आज अग्निशामक दिन : सुविधांचा अभाव, निधीचाही वानवा
भंडारा : आग आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीला धावून येणारे भंडाऱ्यातील अग्निशामक दलच संकटात आहे. मुबलक आणि प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने या विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला असून, या विभागाला अद्ययावत आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वेगळ्या प्रयत्नांची गरज आहे.
भंडार शहर आणि परिसराच्या हद्दीत आगीच्या घटना अथवा आपत्ती उद्भवल्यास सर्व प्रथम मदतीला धावणारे अग्निशामक दलच अडचणीत आहे.
शासनाच्या निकषानुसार जे काम ३२ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी करणे अपेक्षीत आहे, तेच काम केवळ ११ कर्मचाऱ्यांवर केले जाते. जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणावरील महत्त्वाचा विभाग असलेल्या या विभागाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे जाणवते. येथील अग्निशामक दलात काही कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. परंतु, एक विभागप्रमुख, अन्य फायरमन आणि वाहनचालक २४ तास काम करतात. त्यांच्या मदतीसाठी मदतनीस नाही. त्यामुळे मदनिसचे काम फायरमन आणि वाहनचालकांना करावी लागतात, फोन ड्युटीसाठी कर्मचारी नाही. पाणीपुरवठा विभागाचा कर्मचारी फोनची जवाबदारी पार पाडतो.
एक चौकीदार दिलेला आहे. जे कर्मचारी या विभागात काम करतात ते ही प्रशिक्षित नाहीत. त्यामुळे विभागातील अडचणींवर मात करीत उद्भवलेली अडचण अथवा आलेल्या संकटाला तोंड देण्याचे काम या कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. शहर आणि परिसराचा वाढलेला आवाका लक्षात घेता या ठिकाणी दोन अग्नीशामकदलाची आवश्यकता आहे. परंतु, एकाच ठिकाणाहून सर्वच घटनांवर नियंत्रण केले जाते. अग्नीशामकदलाच्या विभागप्रमुखांनी वेळोेवळी प्रशासनाकडे पत्र पाठवूनही या विभागात पुरेसे कर्मचारी दिलेले नाहीत. उन्हाळ्याच्या दिवसात आग लागण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात घडतात. मात्र हव्या त्या प्रमाणात सुविधा वेळेवर उपलब्ध होत नाही., हीच खरी शोकांतिका आहे. (प्रतिनिधी)
साकोलीत सेवेअभावी तारांबळ
साकोली : तालुक्याची लोकसंख्या २५ हजाराच्या वर आहे. येथे उपविभागीय कार्यालयासह विविध शासकीय कार्यालये, महाविद्यालये, प्रतिष्ठाने आहेत. साकोलीची ओळख इंग्रज काळापासून असली तरी या ठिकाणी अग्निशामक दलाचे कार्यालय नसणे ही तालुकावासीयांसाठी शोकांतिका आहे. साकोली तालुक्यात आगीच्या यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. आग लागताच नागरिकांची तारांबळ नेहमीच पहावयास मिळते. आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी येथील आगग्रस्ताला भंडारा, तुमसर येथील अग्निशामक दलाला पाचारण करावे लागते. ही वाहने साकोली तालुक्यात पोहचेपर्यंत आगीचा भडका वाढून साहित्य भस्मसात होतात. केवळ निखारे विझविण्याच्या कामी अग्निशामक दलाचा उपयोग होतो. साकोलीत पर्यायी व्यवस्था झाल्यास जीवहानीसह वित्तहानी टळू शकते. साकोली ग्रामपंचायतीला नुकताच नगर पंचायतचा दर्जा मिळाला आहे. यामुळे येथे अग्निशामक कार्यालय होणे गरजेचे आहे.
लाखांदूर पोरका
दिघोरी : आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक दलाची भूमिका फार महत्वाची असते. लाखांदूर तालुक्यात कुठेही अग्निशामक दलाची नेमणूक झाली नसल्याने तालुक्यातील जनतेला अचानक लागणाऱ्या आगीपासून बचाव करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. तालुक्याची स्थापना होऊन बरेच वर्ष लोटले असले तरी या तालुक्यातील जनता अग्निशामक दलाच्या सुविधेपासून वंचित आहे. तालुक्यात कुठेही आग लागली तर भंडारा येथून अग्निशामक दलाचा ताफा येईपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केलेले असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित हानी व वित्त हानीला तालुक्याच्या जनतेला सामोरे जावे लागले आहे. लाखांदूर तालुक्यात अनेक महत्वाची कार्यालये आहेत. अग्निशामक दलाचे महत्व पटले असते तर आजपर्यंत अग्निशामक दलाची स्थापना होऊन तालुक्यात घडणाऱ्या आगीच्या घटनांना आटोक्यात आणून वित्त हानी व जीवितहानी टाळता आली असती.