आंधळगावात साडी सेंटरला भीषण आग; तीस लाखांचे कापड भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 13:34 IST2022-03-03T12:32:22+5:302022-03-03T13:34:05+5:30
आंधळगाव येथील आगरकर चौकातील वैभवलक्ष्मी साडी सेंटरला पहाटे ५ च्या सुमारास आग लागल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. या घटनेत दुकानातील ३० लाखांच्या कपड्यांची पूर्णत: राखरांगोळी झाली आहे.

आंधळगावात साडी सेंटरला भीषण आग; तीस लाखांचे कापड भस्मसात
भंडारा : मोहाडी तालुक्याच्या आंधळगाव येथील होलसेल कापड दुकानाला गुरुवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत दुकान पूर्णत: भस्मसात झाले असून जवळपास तीस लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. हे दुकान ओमशंकर सोनकुसरे यांच्या मालकीचे असून अज्ञाताने आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, आंधळगाव येथील आगरकर चौकातील वैभवलक्ष्मी साडी सेंटर या होलसेल कापड दुकानाला पहाटे ५ च्या सुमारास आग लागल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. याबाबत माहिती मिळताच मोहाडी येथून अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहचले व आगीवर ताबा मिळवला. सकाळी ९-९:३० पर्यंत आग आटोक्यात आणण्यात दलाला यश आले.
या घटनेत दुकानातील साडेतीन लाखांच्या रोकडसह ३० लाखांच्या कपड्यांची पूर्णत: राखरांगोळी झाली. तर, दुकानाबाजुला असलेल्या एका घरालाही आगीच्या झळा पोहोचल्या. आगीत झालेल्या नुकसानीमुळे दुकानमालक ओम प्रकाश सोनकुसरे हे मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी कुणीतरी अज्ञाताने ही आग लावली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.