देव्हाडी उड्डाणपुलात ‘सीसीआर’ की ‘फ्लाय अॅश’चा भराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 22:04 IST2018-11-09T22:03:58+5:302018-11-09T22:04:28+5:30
देव्हाडी उड्डाणपुलाच्या बांधकामात सीसीआर राखेचा वापर करण्यात येत आहे. सामान्यत: फ्लाय अॅशचा वापर केला जातो. आर्द्रता मिळाल्यास जी राख एकसमान पसरते तथा ती जागा सोडत नाही.

देव्हाडी उड्डाणपुलात ‘सीसीआर’ की ‘फ्लाय अॅश’चा भराव
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : देव्हाडी उड्डाणपुलाच्या बांधकामात सीसीआर राखेचा वापर करण्यात येत आहे. सामान्यत: फ्लाय अॅशचा वापर केला जातो. आर्द्रता मिळाल्यास जी राख एकसमान पसरते तथा ती जागा सोडत नाही. येथे पावसाळयात पूल भरावातील राख पावसाने वाहून पूलातून बाहेर पोच रस्त्यावर पसरली होती. मागील चार महिन्यापासून ती वाहतुकीमुळे हवेत पसरत आहे. पोचमार्गावर पाणी घालून तात्पुरता दिलासा देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता. पाणी सुकल्यानंतर पुन्हा राख हवेत पसरते.
तुमसर - गोंदिया मार्गावर देव्हाडी येथे रेल्वे फाटक क्रमांक ५३२ वर मागील चार वर्षापासून उड्डाणपूलाचे काम कासवगतीने सुरु आहे. वाहतूकीकरिता दोन्ही बाजूला पोचमार्ग तयार करण्यात आला आहे. सध्या दोन्ही बाजूला पोचमार्ग खड्डेमय झाला आहे. खड्यातून येथे मार्गक्रमण करावे लागत आहे. उड्डाणपूलातील भराव हा फ्लाय अॅश भरण्यात आला आहे असे सांगण्यात येत आहे. परंतु ही राख सीसीआर असल्याचे समजते. पावसाळ्यात पूलातील भरावातील राख पोचमार्गावर पसरली. ती पोचमार्गावर मोठ्या प्रमाणात पसरली. वाहतुकीमुळे ती राख सध्या हवेत तरंगत आहे. समोरचे वाहन येथे दिसत नाही. प्रदूषणात येथे वाढ झाली आहे. दृष्यमानता कमी असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
उड्डाणपूलाच्या बांधकामात भरावाकरिता मुरुम व मातीचा वापर केला जात होता. पंरतु सध्या सीसीआर राखेचा वापर केला जातो. वीज प्रकल्पातील तयार होणारी फलॉय अॅश वापरुन रस्ते, महामार्ग, पूल बांधकामासाठी त्याचा वापर होतो. कोल कम्बशन रेसिड्यूएल म्हणून प्रचलित सीसीआर राख धोकादायक आहे. श्वसनातून शरीरात गेल्यावर त्याचे घातक परिणाम होतात. फ्लाय अॅश ही सीसीआर राखेचा हलका प्रकार आहे. मानवी जिवाला ती अत्यंत धोकादायक मानली जाते. सदर राखेत फुफ्फुसालाही भिजवून टाकण्याची क्षमता आहे. देव्हाडी उड्डाणपुलातून पोचमार्गावर पसरलेली राख तात्काळ उचलून तिची विल्हेवाट लावण्याची गरज आहे. पाणी पोचमार्गावर शिपंडणे हा केवळ तात्पुरता उपाय आहे. ही राख कधीही नाहीशी होणार नाही.
उड्डाणपूल बांधकाम दगडाने केले आहे. दगडातून ती पाण्यासोबत पोचमार्गावर पसरली. फ्लाय अॅशला आर्द्रता मिळाल्यास ती घट्ट होते. ती पसरत नाही. अथवा वाहून जात नाही. सीसीआर राखेचा हा हलका प्रकार आहे. सीसीआर राख ही जीवघेणी असते. नेमकी कोणती राख आहे याची चौकशीची गरज येथे आहे. या पुलाचे बांधकाम कोट्यावधी रुपयांचे आहे. जागतिक बँकेने त्याकरिता आर्थिक निधी दिला आहे. हे विशेष.
राखेच्या त्रासाची तक्रार अनेकदा देव्हाडीवासीयांनी संबंधित विभागाला दिली, परंतु त्यावर अजूनपर्यंत कारवाई झाली नाही.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरे व वस्ती आहे. त्यांची दारे, खिडक्या मागील दीड वर्षापासून कायम बंद ठेवली आहेत. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोचमार्गावरील राख तात्काळ दूर करण्याची गरज आहे.
उड्डाणपूल भरावात फ्लाय अॅशचा वापर केला जातो. देव्हाडी येथील पूलातून राख वाहून पोचमार्गावर पसरली. सदर राखेत कॉर्बन कम्पाऊंड हे विषारी कण आढळतात. याचा मानवी जीवावर विपरीत परिणाम होतो. रस्त्यावरील राख उचलून तिची विल्हेवाट लावणे हा मुख्य पर्याय येथे आहे. महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाने येथे दखल घ्यावी.
- इंजि. विपील कुंभारे, जिल्हा महासचिव जि.कॉ.कमेटी अनुसूचित सेल