तंटामुक्त अध्यक्षाचा मजुरावर प्राणघातक हल्ला
By Admin | Updated: July 23, 2015 00:29 IST2015-07-23T00:29:46+5:302015-07-23T00:29:46+5:30
तालुक्यातील रोहा येथील तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अशोक राऊत यांनी शिवराम शेंडे (४५) या मजुराला रविवारला मारहाण केली.

तंटामुक्त अध्यक्षाचा मजुरावर प्राणघातक हल्ला
रोहा येथील घटना : आरोपीला अटक न झाल्यास शेंडे कुटुंबीयांचा उपोषणाचा इशारा
मोहाडी : तालुक्यातील रोहा येथील तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अशोक राऊत यांनी शिवराम शेंडे (४५) या मजुराला रविवारला मारहाण केली. या मारहाणीमुळे गावात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. आता वातावरण शांत आहे.
शेंडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. पाच दिवसानंतरही तो बेशुद्ध आहे. मात्र मोहाडी पोलिसांनी आतापर्यंत तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष राऊतला अटक न केल्यामुळे ग्रामस्थांनी पोलिसांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे जखमी शेंडे या कुटुंबीयांनी पत्रपरिषद घेऊन राऊत याच्या अटकेची मागणी केली. अटक न झाल्यास उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
शिवराम शेंडे यांनी अशोक राऊत यांच्या कौलारू घराच्या छताची फेराई केली. या कामाचे पैसे १६ जुलै रोजी सायंकाळी मागितले असता राऊत याने वाद घालून शेंडे यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यात शेंडे हे जमिनीवर कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची शुद्ध हरपली. त्यानंतर त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. मात्र परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे पहिले मोहाडी त्यानंतर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. तिथेही डॉक्टरांनी नागपूरला हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. तिथे ते मृत्यूशी झुंज देत आहेत.
या घटनेची तक्रार घेण्यासाठी पोलिसांनी दोन दिवस टाळाटाळ केली. दोन दिवसानंतर १८ जुलै रोजी तक्रार घेऊन गुन्हा दाखल केला. मात्र अजूनपर्यंत आरोपीला अटक केली नाही. त्यामुळे आरोपीला अटकपूर्व जामीन घेण्यास वेळ मिळत आहे, असा शेंडे कुटुंबीयांनी पत्रपरिषदेत आरोप केला. आरोपीला अटक न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शेंडे कुटुंबीयांनी दिला आहे. पत्रपरिषदेला महादेव कांबळे, बालकदास बनकर, बालचंद शेंडे, घनश्याम नगरधने, बळीराम शेंडे, नत्थू बावणे आदी घटनेचे साक्षीदार उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी गावातून फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. जर कोणाला आरोपीची माहिती मिळाल्यास त्यांनी पोलिसांना कळवावे. पोलिसांची भूमिका सर्वांसाठी समान आहे.
- सुहास चौधरी
सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे मोहाडी.