खताचा काळाबाजार खपवून घेणार नाही
By Admin | Updated: September 20, 2014 23:44 IST2014-09-20T23:44:50+5:302014-09-20T23:44:50+5:30
मागीलवर्षी अतिवृष्टीने धानपिकाचे हातातून गेले. यावर्षी अत्यल्प पावसामुळे कुठे दुबार तर कुठे तिबार पेरणीची शेतकऱ्यांवर वेळ आली. त्यातच खताचा काळाबाजार सुरु झाल्यामुळे शेतकरी

खताचा काळाबाजार खपवून घेणार नाही
शेतकरी हवालदिल : आ.नरेंद्र भोंडेकर गरजले
भंडारा : मागीलवर्षी अतिवृष्टीने धानपिकाचे हातातून गेले. यावर्षी अत्यल्प पावसामुळे कुठे दुबार तर कुठे तिबार पेरणीची शेतकऱ्यांवर वेळ आली. त्यातच खताचा काळाबाजार सुरु झाल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. शेतकऱ्यांवर अस्मानीसह सुलतानी संकट ओढवले असल्यामुळे शेतकऱ्यांना विनात्रास आवश्यक तितके खत देण्यात यावी, असे सांगून खताचा काळाबाजार खपवून घेणार नाही, असा ईशारा आमदार आ.नरेंद्र भोंडेकर यांनी दिला.
यावेळी ते म्हणाले, जिल्ह्यात रॅकपार्इंट व्हावे, ही मागणी सभागृहात सातत्याने लावून धरली. तत्कालीन केंद्रातील संपुआ सरकारने भंडाऱ्यात रॅकपार्इंट करण्यासाठी चारवेळा पाहणी करुन गेले. परंतु, रॅकपार्इंट मात्र झाले नाही. शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या खताचा काळाबाजार हा मुख्यत्वे करुन त्या-त्या खासगी कंपनीकडून सुरू आहेत. त्यात त्या कंपनीचे अधिकारी सहभागी असल्याचा आरोप आ.भोंडेकर यांनी केला आहे.
भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा आहे. या जिल्ह्यातील शेतकरी मुख्यत्वेकरुन धानाची शेती करतात.
यावर्षी भंडारा जिल्ह्यात १.८२ लाख हेक्टर क्षेत्रात धानपिकांची लागवड केली आहे. परंतु यावर्षी मृगाचा पाऊस पडला नाही, त्यानंतर जून महिना कोरडा गेला. जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली तोपर्यंत पऱ्हे करपले. काहींनी पाणी देऊन पऱ्हे वाचविले. त्यानंतर पाऊस बरसला, शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. पऱ्हे मोठे झाले असताना शेतकऱ्यांना खते मिळण्यासाठी अडचणी येऊ लागल्या. परिणामी शेतकरी त्रस्त झाला आहे.
एकीकडे खताचा मुबलक पुरवठा आहे, असे सांगणारे जिल्हा प्रशासनाचे या काळाबाजारीकडे लक्ष गेलेले नाही. जिल्हा प्रशासन करते तरी काय? असा सवाल करुन शेतकऱ्यांची समस्या सोडवावी, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.
कोट्यवधीचे कामे
खेचून आणली
पवनी शहरात बसस्थानक ते नगरपरीषद शाळा या मार्गासाठी सात कोटींचा निधी मिळवून दिला असून कामे प्रगतीपथावर आहेत. अड्याळ, कोंढा, आसगाव, पहेला, भंडारा शहरातील राजीव गांधी चौक ते नागपूर नाका आणि शास्त्री चौक ते आयटीआयपर्यंतचे चौपदरीकरण होणार आहे.
ही कामे होताच शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. अड्याळ येथे ३० खाटांचे रुग्णालय ५० खाटांचे केले. भंडाऱ्यात १०० खाटांचे महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय मंजूर झाले आहे. क्रिडा संकुलाच्या विकासासाठी सात कोटी मंजूर केले आहे. पांडे महालाचे वास्तु संग्रहालय आणि सांस्कृतिक भवनाचे काम प्रस्तावित असल्याचे आ.भोंडेकर यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)