लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 07:05 IST2025-04-30T06:59:54+5:302025-04-30T07:05:34+5:30

एकुलती लेक असलेल्या पल्लवीच्या लग्नाची तयारी पित्याने महिनाभरापासून सुरू केली होती. घरात आनंदाचे वातावरण होते. मंगळवारी सकाळच्या पाळीत लग्नसमारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

Father dies at daughter's wedding in Bhandara | लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण

लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण

चुल्हाड / खापा (जि. भंडारा) :  लग्नसमारंभासाठी वरात वधूच्या घरी पोहोचली. मंगलाष्टके पडली. वधूपित्याने अक्षता व फुलांचा वर्षाव करीत लेकीला सुखी आयुष्याचा आशीर्वाद दिला. लेक सासरी पाठवण्याची तयारी सुरू असतानाच वधूच्या पित्याला  हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यात त्यांनी मांडवातच प्राण सोडले. दगडालाही पाझर फोडणारी ही हृदयद्रावक घटना मंगळवार, २९ एप्रिलला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तुमसर तालुक्याच्या झारली येथे घडली. गणेश मयाराम खरवडे (५४) असे मृत वधूपित्याचे नाव आहे. लग्नमंडपातील आनंदाचे वातावरण क्षणभरात दुःखात बुडाले.

ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक

एकुलती लेक असलेल्या पल्लवीच्या लग्नाची तयारी पित्याने महिनाभरापासून सुरू केली होती. घरात आनंदाचे वातावरण होते. मंगळवारी सकाळच्या पाळीत लग्नसमारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मुलीच्या लग्नात काही कमी पडू नये, यासाठी वधूपित्याची धडपड सुरू होती.  भंडारा येथील वर असलेला आकाश मंदूरकर हा वरात घेऊन दुपारी १२ वाजता लग्नमंडपी दाखल झाला. सनईच्या मधुर सुरात आकाश आणि पल्लवी विवाहबंधनात अडकले.

आनंदी वातावरण दु:खामध्ये परावर्तित

लेकीला सासरी जाण्यासाठी निरोप देण्याची वेळ झाली होती. त्यासाठी तयारीही सुरू झाली; परंतु कदाचित नियतीला हे मान्य नसावे.

नववधू पल्लवीला निरोप देण्यापूर्वी मांडवातच दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गणेश खरवडे यांना हृदयविकाराचा धक्का आला. यात त्यांची प्राणज्याेत मालवली.

अचानक आनंदाचे वातावरण दु:खात परावर्तित झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा आहे.

जड अंत:करणाने पल्लवीने घेतला माहेरचा निरोप

लग्नाच्या दिवशी सासरी जात असतानाच वडिलांचा मृत्यू झाला. वधू पल्लवीला क्षणभरापूर्वीच वडिलांनी आशीर्वाद दिला. क्षणात होत्याचे नव्हते झाले.

सायंकाळी उशिरा गणेश खरवडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर जड अंत:करणाने पल्लवीने माहेर सोडले. मुलीला सासरी निरोप देण्यापूर्वीच वडिलांनी जगाचा निरोप घेतला.

ही बाब अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवून गेली.

Web Title: Father dies at daughter's wedding in Bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.