जीर्ण इमारतीत जीवघेणे विद्यार्जन
By Admin | Updated: January 13, 2016 00:32 IST2016-01-13T00:32:10+5:302016-01-13T00:32:10+5:30
जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या निर्लेखनाचा ठराव जिल्हा परिषदने घेतलेला आहे. असे असतानाही पवनी तालुक्यातील अत्री येथे मागील दोन वर्षांपासून इमारत बांधकामाला निधी उपलब्ध झालेला नाही.

जीर्ण इमारतीत जीवघेणे विद्यार्जन
प्रशांत देसाई भंडारा
जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या निर्लेखनाचा ठराव जिल्हा परिषदने घेतलेला आहे. असे असतानाही पवनी तालुक्यातील अत्री येथे मागील दोन वर्षांपासून इमारत बांधकामाला निधी उपलब्ध झालेला नाही. जीर्ण इमारतीत विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन सुरू आहे. ही इमारत कधीही कोसळण्याचा धोका बळावला असताना शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे येथील विद्यार्थ्यांचा जीव विद्यार्जनासाठी टांगणीला लागला आहे.
पवनी तालुक्यातील आडमार्गावर असलेल्या अत्री या गावाची लोकसंख्या जेमतेम ५०० च्या आसपास आहे. येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा मिळावी, यासाठी शिक्षण विभागाने गावात इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शाळा सुरू केली. यासाठी ३८ वर्षापूर्वी एक कौलारू तर २६ वर्षापूर्वी एक स्लॅबची वर्गखोली बांधली. दिवसामागून दिवस निघत गेले, तसे शाळा इमारत जीर्ण झाली आहे.
याबाबत मागील काही वर्षांपासून ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी पवनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार केला. मात्र, याकडे शिक्षण विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. शाळेच्या दोन्ही वर्गखोली पूर्णपणे जीर्ण झालेले असून त्या निर्लेखित करण्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने शिक्षण विभागाकडे सुपूर्द केला. याला दोन वर्षांचा कार्यकाळ लोटला असतानाही शिक्षण विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
इमारतीला तडे, स्लॅब उखडला
अथ्री जिल्हा परिषद शाळेच्या कौलारू व स्लॅबच्या इमारतीचे छत जीर्ण झाले आहे. यामुळे पावसाळ्यात कौलारू वर्गखोली चहूबाजूंनी गळते. त्यामुळे विद्यार्थी छताखाली बसूनही ओले होतात. स्लॅब कालबाह्य झाल्याने प्लास्टरचे तुकडे खाली कोसळत असल्याने जीर्ण झालेल्या लोखंडी सळाखी दिसत आहेत. एखाद्यावेळी कौलारू व स्लॅबची वर्गखोली कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
३८ विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला
या शाळेत पहिल्या वर्गात ११, दुसऱ्या वर्गात ०९, तिसऱ्या वर्गात ११ तर चौथीत ०७ असे ३८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने शाळेची इमारत धोकादायक असून निर्लेखनाचा अहवाल दोन वर्षापूर्वी घेतला आहे. अशा धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यात येत असल्याने इमारत कोसळून जीवितहाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हा परिषदचा निर्लेखनाचा ठराव
बांधकाम उपविभागाच्या अहवालानुसार जिल्हा परिषद बांधकाम विषय समितीने १४ मार्च २०१४ ला ठराव क्रमांक ४ नुसार इमारत निर्लेखनाचा ठराव घेतला. ठरावानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षणाधिकारी (प्राथ) यांना सूचना दिल्या असून निर्लेखित इमारतीच्या साहित्यांचा लिलाव करून रक्कम जिल्हा परिषद निधी खात्यात जमा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.