पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
By Admin | Updated: July 20, 2016 00:27 IST2016-07-20T00:27:52+5:302016-07-20T00:27:52+5:30
प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फायदेशिर ठरणारी योजना असून या योजनेला ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
जिल्हाधिकारी चौधरी यांचे आवाहन
भंडारा : प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फायदेशिर ठरणारी योजना असून या योजनेला ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार असल्यामुळे या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
या योजनेत पिकांच्या नुकसानीचे अत्यंत परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राहणार आहे. पीक कर्ज घेणाऱ्या इच्छुक शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०१६ अखेर कर्ज घेतले असल्यास विमा प्रिमीयम रक्कम कपात करण्यात येवून सर योजनेचा लाभ घेता येईल. तरी शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०१६ अखेर कर्ज घेण्याची कारवाई करावी. तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०१६ अखेर कर्ज घेण्याची कारवाई करावी. तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सुद्धा ३१ जुलै २०१६ पर्यंत पीक विमा काढून घेण्याची कारवाई करावी. खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात. शेतकऱ्यांना भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी २ टक्के व रब्बी हंगामाकरिता १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के मर्यादित आहे आणि जोखीमस्तर सर्व पिकांसाठी ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे. पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, पूर, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे पिकाच्या उत्पन्नात घट आल्यास विमा संरक्षण प्राप्त होईल. या योजनेअंतर्गत हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे व पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतीकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान काढणी पश्चात नुकसान यास विमा संरक्षण मिळेल.
जिल्ह्याकरिता भात व सोयाबीन या २ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. भात पिकांसाठी विमा संरक्षित रक्कम ३९ हजार प्रती हेक्टरी व सोयाबिनसाठी ३६ हजार रुपये प्रति हेक्टरी असून शेतकऱ्यांना भात पिकांकरिता भरावयाचा पिक विमा हप्ता ७८० रुपये प्रती हेक्टरी तसेच सोयाबिनसाठी ७२० रुपये प्रती हेक्टरी भरावयाचे आहेत. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्तावाचे आवेदन पत्र भरून बँकेच्या स्थानिक, प्रादेशिक, प्राथमिक कृषी पत पुरवठा सहकारी संस्था, विमा कंपनीच्या अधिकृत विमा प्रतिनिधी किंवा विमा मध्यस्थांमार्फत विमा हप्ता रकमेसह भरावा. या योजनेत सहभाग झालेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे कापणीनंतर शेतात वाळविण्यासाठी ठेवलेल्या पिकांचे नुकसान झाल्यास त्याबाबतची माहिती ४८ तासांच्या आत संबंधित बँक, वित्तीय संस्था, विमा कंपनी यांना देणे आवश्यक आहे.
बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित पिकासाठी एकदाच विमा कंपनीकडून विमा संरक्षण घेणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होवून योजनेचा लाभ घ्यावा असे जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे. (शहर प्रतिनिधी)