शेतकरी पाल्यांची शहराकडे धाव
By Admin | Updated: July 10, 2014 23:27 IST2014-07-10T23:27:49+5:302014-07-10T23:27:49+5:30
भारत देशाला कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जाते. आज येथील शेतकऱ्यांची अधोगती होत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शासनाचे चुकीचे धोरण

शेतकरी पाल्यांची शहराकडे धाव
निसर्ग कोपला : उदरनिर्वाहासाठी धावपळ, शेती झाली बेभरवशाची
बारव्हा : भारत देशाला कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जाते. आज येथील शेतकऱ्यांची अधोगती होत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शासनाचे चुकीचे धोरण आणि निसर्गाच्या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचा नाहक बळी पडावा लागत आहे. शेतकऱ्यांचे होणारे सततचे हाल यामुळे शेतकरीपुत्रांनी शेतीकठे पाठ फिरविली असून कामाच्या शोधात त्यांनी शहराकडे धाव घेतली असल्याचे चित्र सध्या लाखांदूर तालुक्यात दिसून येत आहे.
देशाची अर्थव्यवस्था कृषी उत्पादनावर आधारलेली असल्याचे म्हटले जाते. देशाला कृषीप्रधान देश तर शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणून संबोधले जाते. आज शेती व शेतकऱ्यांची अधोगती होत आहे. शेतकरी कर्जाच्याबोज्यात भरडला जात आहे. यात धान उत्पादक शेतकऱ्यांची अधिकच अधोगती झाल्याचे चित्र दिसत आहे. सततच्या नापिकी व वाढत्या कर्जाच्या डोंगरामुळे धान उत्पादक शेतकरी आत्महत्येला कवटाळत आहे. याला शासनाचे धोरणच कारणीभूत ठरत असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.
शासन उद्योगक्षेत्राला अधिक प्राधान्य देत असून शेतकऱ्यांची मात्र घोर उपेक्षा केली जात आहे. बजेटमध्ये केवळ कृषीकरिता चार टक्के निधी निर्धारित केली जाते. ही देशाची सर्वात मोठी शोकांतिका आहे. देशात महागाईने कळस गाठला आहे. शेतीउत्पादीत मालाला भाव नाही. मातीमोल भावाने धान्याची विक्री करावी लागते. वाढती शेतमजुरी, रासायनिक खते, किटकनाशके यांच्या भाव वाढीने शेतकऱ्यांना फटका बसत आहे. उत्पादन खर्च अधिक व उत्पन्न कमी अशी शेतकऱ्यांची स्थिती झाली आहे. सतत अस्मानी आणि सुलतानी संकटांना सामोरे जात हाडाचे काडी व रक्ताचे पाणी करून शेतकरी भरघोस उत्पन्न घेण्याची आशा बाळगून शेती करतो. मात्र शेतकऱ्यांचे दुर्भाग्य म्हणावे की काय नियती त्याचा पाठलाग करणे सोडतच नाही. यावर्षी पावसाने तब्बल एक महिन्यापासून दडी मारून बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. हे सगळे करूनही पाऊस आला नाही. तलही गेले, तुपही गेले, हाती आले धुपाटणेच अशी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. जिल्ह्यात मोठे कोणतेही उद्योग नाहीत. धान हे प्रमुख पिक असून यावरच शेतकऱ्याची उपजिविका आहे. येथे धानावर आधारित उद्योग निर्मितीची गरज आहे. यासाठी जिल्ह्याचे खासदारांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात कोणतेही उद्योग नसल्याने व शेती परवडण्यासारखी नसल्याने शेतकरीपुत्र रोजगाराच्या शोधात पुणे, मुंबईसारख्या शहरात जावून रोजगार करण्यासाठी जात आहेत. (वार्ताहर)