धानशेतीत भेगा पडल्याने शेतकऱ्यांचे फाटले काळीज
By Admin | Updated: August 28, 2016 00:09 IST2016-08-28T00:09:55+5:302016-08-28T00:09:55+5:30
धान पिकाचे मोठ्या प्रमाणात घेवून कर्जाचा बोझा कमी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बळीराजाला यावर्षी निसर्गाने रडकूंडीस आणले आहे.

धानशेतीत भेगा पडल्याने शेतकऱ्यांचे फाटले काळीज
तलावाच्या जिल्ह्यात पाण्याचा तुटवडा : शेतकऱ्यांच्या डोळ्यात स्वप्नाऐवजी दिसू लागली अश्रू
भंडारा : धान पिकाचे मोठ्या प्रमाणात घेवून कर्जाचा बोझा कमी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बळीराजाला यावर्षी निसर्गाने रडकूंडीस आणले आहे. कशीबशी रोवण आटोपली मात्र आता धानपिकाला वाचविण्याचा शेतकऱ्यांना शर्तीचा प्रयत्न करावा लागत आहे. जिल्ह्यात पावसाने मोठी उसंत घेतल्याने शेत जमिनीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचे काळीज फाटल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
मागील काही वर्षांपासून निसर्गाने शेतकऱ्याला हवालदिल केले आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळाच्या चक्रात अडकलेला शेतकरी यातून बाहेर येण्याचे केवळ स्वप्न बघत आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस राहील असे भाकित वेधशाळेने वर्तविले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठी स्वप्न रंगवून शेतीच्या हंगामात स्वत:ला झोकून घेतले होते. कर्जबाजारी होवून शेतकऱ्यांनी शेतात बी-बियाणे पेरले. सुरुवातीला हलका पाऊस पडला त्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकली. त्यानंतर मध्यम पावसाने हजेरी लावली. अश्यात त्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था होती त्यांनी रोवणी आटोपली.
मात्र त्यांच्याकडे सिंचनाची सुविधा नव्हती ते चातक पक्षाप्रमाणे पावसाची वाट पाहत होता. आज येईल उद्या येईल असा स्थितीत शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोरुन काळेभोर ढग धावत होते. मात्र पाऊस पडला नाही. यास्थितीत शेतकऱ्यांच्या हातातील धानाचे उत्पादन जाण्याची स्थिती निर्माण झाली. अनेकांच्या शेतात पावसाअभावी रोवणी लांबली तर अनेकांच्या अद्यापही खोळंबलेल्या आहेत.
अश्या विदारक स्थितीत ज्यांची रोवणी आटोपली त्या धानाला शेवटच्या पाण्याची गरज असतांना निसर्गाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे शेतात धान रोवलेले असतांनाही पाणी नसल्याने शेतजमिनीला तडे गेलेले दिसून येत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी रोवणीसाठी लावलेला खर्चही आता निघण्याची आशा धुसर झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात भविष्याचे स्वप्न नसून केवळ अश्रू दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात दयावा अशी अपेक्षा बळीराजाने वर्तविली आहे. मात्र जिथे निसर्गानेच दगा दिला तिथे सरकार साथ देईल काय? अशी ही भीती त्यांच्या मनात घर करुन बसली आहे. शेतकऱ्यांना आता खरोखरच मदतीची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)