शेतकऱ्यांना मिळणार बोनस
By Admin | Updated: March 10, 2016 00:52 IST2016-03-10T00:52:32+5:302016-03-10T00:52:32+5:30
अवकाळी पाऊस व विविध नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील धान उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याची बाब घेऊन धान ..

शेतकऱ्यांना मिळणार बोनस
बोनसमुळे धान खरेदी वाढली : प्रती क्विंटल २०० रुपये बोनस
भंडारा : अवकाळी पाऊस व विविध नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील धान उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याची बाब घेऊन धान उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत दराव्यतिरिक्त २०० रुपये प्रतिक्विंटल प्रोत्साहनपर बोनस देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या प्रोत्साहनपर राशीमुळे ६० कोटी इतका अतिरिक्त खर्च होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रावर धान विकणाऱ्या १६ हजार ७८० शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
पूर्व विदर्भात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. मागील काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे धान उत्पादनात घट आली आहे. दिवसेंदिवस वाढणार उत्पादन खर्च आणि रासायनिक खते, किटकनाशके तसेच मजुरीमध्े झालेली वाढ यामुळे धान शेती अडचणीत आली आहे.
दरवर्षी केंद्र शासनातर्फे शेतमालाचे भाव निश्चित करण्यात येतात. यावर्षी अ - श्रेणी धानाला १४५० रुपये तर साधारण धानासाठी १४१० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडचणीत असलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यास मंजुरी दिल्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळाला आहे.
आधारभूत धान खरेदी केंद्रावर ज्या शेतकऱ्यांनी २०१५-१६ खरीप व रब्बी हंगामातील धानाची विक्री केली अशा शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून जिल्ह्यात ५ लाख ९९ हजार ११९ क्विंटल धान खरेदी झाली आहे. (नगर प्रतिनिधी)