भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्याची पायपीट
By Admin | Updated: March 9, 2016 01:44 IST2016-03-09T01:44:37+5:302016-03-09T01:44:37+5:30
पवनी तालुक्यातील अत्री येथील गट क्रमांक ४०० ही जमीन प्रशासनाने भूसंपादित केली. त्याचा मोबदला शेतकरी पद्माकर पनके यांना द्यावा,....

भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्याची पायपीट
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली : अत्री येथील शेतकऱ्याची व्यथा, शासनाकडून टोलवाटोलवी
भंडारा : पवनी तालुक्यातील अत्री येथील गट क्रमांक ४०० ही जमीन प्रशासनाने भूसंपादित केली. त्याचा मोबदला शेतकरी पद्माकर पनके यांना द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले असताना त्यांना भुसंपादनाच्या मोबदल्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
भंडारा येथील महात्मा फुले वॉर्डातील पद्माकर पनके यांची शेतजमीन पवनी तालुक्यातील अत्री येथे आहे. शेतीचा गट क्रमांक ४०० असून त्यातील ३१.२६ संपादित क्षेत्र आहे. याबाबत १६ जुलै २०१५ ला शेतजमिनीच्या भुसंपादनाचा मोबदला मिळावा या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी निवाडा दिला आहे.
याबाबत भुसंपादनाची रक्कम प्राप्त करण्यासाठी व पद्माकर पनके यांचे नावे अवॉर्ड पारित झाले असल्याने रक्कमेच्या मोबदल्यासाठी ते पवनी तहसील कार्यालयात गेले होते.
मात्र त्यांना रक्कम न देता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. व्यथित होवून पनके यांनी सदर प्रकरण लोकशाही दिनी तक्रार नोंदविली. तक्रारीच्या अनुशंगाने संबंधित विभागाने पनके यांना पत्र पाठवून गोसीखुर्द उपसा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यावर जबाबदारी देवून त्यांना मोबदला देण्याचे सूचित केले.
त्या अनुषंगाने पनके यांनी गोसीखुर्दच्या कार्यालयात जावून कागदपत्राचे सोमस्कार पुर्ण केले व बँक खात्यावर रक्कम वळती व्हावी यासाठी बँक खाता क्रमांक दिला. मात्र सहा ते सात महिन्याचा कालावधी उलटूनही पनके यांना भूसंपादनाची रक्कम अद्याप प्राप्त झाली नाही.
भूसंपादनाच्या संदर्भात अवॉर्ड पारित झाल्यानंतरही भूमिधारकाला रक्कमेसाठी शासकीय कार्यालयात उंबरठे झिजवावे लागत आहे. त्यामुळे शासनाने त्यांची थकित रक्कम व्याजासह द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)