ओसाड शिवारात फुलणार शेती

By Admin | Updated: March 23, 2015 00:47 IST2015-03-23T00:47:55+5:302015-03-23T00:47:55+5:30

शिवारातील पाणी शिवारातच जिरवून भूगर्भातील पातळी वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे.

Farmers flock to the waste camp | ओसाड शिवारात फुलणार शेती

ओसाड शिवारात फुलणार शेती

प्रशांत देसाई  भंडारा
शिवारातील पाणी शिवारातच जिरवून भूगर्भातील पातळी वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी मदतीचा हात पुढे केल्यास रूक्ष व ओसाड शिवारात हिरव्या स्वप्नांची बाग रूजवण्यास मदत होणार आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे ओसाड शिवार कात टाकणार असून तिथे पुढील काही वर्षात शेती फुलणार, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याची पातळी कमालीची घसरत असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. यावर मात करण्यासाठी शासनाच्या वतीने जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. परंतू प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेल्या या विधायक कामासाठी शासनासोबत जनसमुदायाच्या मदतीची गरज आहे.
यातून पाण्याचे पून:र्भरण होऊन गावातील पाणीप्रश्न भविष्यात सुटण्यास मदत होणार आहे. यासोबतच गाळ उपसल्याने सिंचन क्षमता वाढणार असून मच्छिमारीला फायदा होणार आहे.
शिंगाळा व्यावसायीकाला याचा मोठा फायदा होणार आहे. तलावांमधील गाळ उपसल्या जाणार असल्याने पर्यायाने विहिर व बोअरवेलच्या पाण्याची पातळीही वाढणार आहे. शासन सर्वतोपरी सहाय्य करीत असले, तरी लोकसहभाग मिळाल्यास या कामाला गती येऊन भविष्यातील अनेक पिढ्यांना जल सुरक्षा मिळू शकणार आहे.
नैसर्गिक पाणीसाठे निर्माण करण्यासाठी ग्राम प्रशासनासह गावकऱ्यांनी उत्स्फुर्त सहभाग दिल्यास गावातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
पुढील पाच वर्षे राबवण्यात येणाऱ्या या अभियानात अडचणी निर्माण न करता त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करून शिवार गावातील पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यात यावा, यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे.
लाखमोलाचा गाळ होणार उपलब्ध
या अभियानामुळे लाखमोलाचा वाहून जाणारा गाळ वाचविण्यासाठी मदत होणार आहे. हा गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात टाकून जमिनीचा पोत सुधारता येणार आहे. सिंचनाला मिळणारे पाणी बंधारा, पाझर तलाव, तलाव खोलीकरण आदींच्या माध्यमातून शिवारातील एका पाण्याने वाया जाणारे पीक शेतकऱ्यांना वाचवता येणे शक्य आहे.
१० दिवस यंत्रे द्यावी
गावपातळीवर उपलब्ध असलेले ट्रॅक्टर, जेसीबी आदी आवश्यक यंत्रसामुग्री गावकऱ्यांनी आपल्याच गावात होत असलेल्या सुधारणांसाठी द्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी लागणारा चालक व डिझेलचा खर्च प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. प्रत्येक गावागावातील नागरिकांनी या अभियानासाठी पुढाकार घेतल्यास निश्चितच पाण्याअभावी हातचे जाणारे पीक शेतकऱ्यांना वाचवता येतील.
तलावांचे होणार पुनरूज्जीवन
सुमारे दोनशे ते तीनशे वर्षापूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या तलावांत मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यांचा गाळ उपसण्यात आलेला नाही. त्यामुळे तलावांच्या क्षमतेत कमालीची घट झाली आहे. यातील गाळ काढण्यात येणार आहे. यामुळे ८६ गावांमधील तलावांचे पुनरूज्जीवन होणार आहे.

Web Title: Farmers flock to the waste camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.