शेतकऱ्यांचे उपोषण सुरूच
By Admin | Updated: October 30, 2015 00:46 IST2015-10-30T00:46:40+5:302015-10-30T00:46:40+5:30
नियमबाह्य कामे करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सावकारांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, त्यांचे सोने परत करण्यात यावे ...

शेतकऱ्यांचे उपोषण सुरूच
सावकारांचा विरोध : कर्जदारांचे नावे खतावणीत घ्यावे
भंडारा : नियमबाह्य कामे करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सावकारांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, त्यांचे सोने परत करण्यात यावे या मागणीसाठी आज येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले. जिल्हा उपनिबंधकांनी सावकारांविरुद्ध कारवाई करण्याचे लेखी आदेश दिल्यानंतरही उपोषणकर्त्यांनी जोपर्यंत कर्जदारांचे नावे सावकाराच्या खतावणीत घेत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा पवित्रा घेतला.
लाखांदूर तालुक्यातील परवानधारक सावकार यांनी पात्र शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीकरिता प्रस्ताव सादर केले नाहीत. काही परवानाधारक सावकारांनी नमुना ८ पावती न देता कोऱ्या कागदावर किंवा व्हिजीटिंग कार्डवर लिहून सोने गहाण ठेवले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे प्रस्ताव सावकारांनी पाठविले नाही अशा शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात यावा, शेतकऱ्यांची फसवणूक केली म्हणून सावकारांविरुद्ध पोलीस कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांना घेऊन सावकारी कर्जमुक्ती संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात आज जवळपास ७० शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला प्रारंभ केला. जिल्हा उपनिबंधकांनी शिष्टमंडळाला पाचारण करून त्यांना मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिले. यात लाखांदूर तालुक्यातील परवानाधारक सावकार छबीलाल भरणे तसेच दुधराम भरणे, आशिष भरणे, शेखर भुरे व कैलाश मस्के या अवैध सावकारांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश लाखांदूर सहाय्यक निबंधकांना देण्यात आले आहेत. परवानाधारक सावकाराने सोने तारणाची खोटी पावती देऊन फसवणूक केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यास काहीच हरकत नाही, असे लाखांदूर पोलिसांना कळविल्याचे दिसून आले.
छबीलाल भरणे या परवानाधारक सावकाराने ज्या शेतकरी कर्जदारांना ८ नंबरची पावती दिलेली आहे. परंतु त्यांचे नाव सावकाराच्या खतावणीत घेतली नाही असे शेतकरी शासनाने घोषित केलेल्या सावकारी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहू नये याबाबत वरिष्ठ कार्यालयांकडून आदेश देण्यात आले, असे लेखी आश्वासन दिले. मात्र, जो पर्यंत सावकाराच्या खतावणीत नावे घेण्यात यावी, सावकारी कर्जमाफी योजनेत समावेश करावा या मागणीसाठी उपोषणकर्त्यांनी उपोषण सुरुच ठेवले. उपोषणात जवळपास ७० शेतकऱ्यांचा सहभाग आहे. (नगर प्रतिनिधी)