जमीन मोबदल्यासाठी शेतकऱ्यांची फरफट
By Admin | Updated: April 16, 2016 00:24 IST2016-04-16T00:24:16+5:302016-04-16T00:24:16+5:30
गावालगत सिंचन प्रकल्प झाल्यास हरितक्रांती घडून जीवनमान उंचावेल अशी अपेक्षा लवारी येथील शेतकऱ्यांची होती.

जमीन मोबदल्यासाठी शेतकऱ्यांची फरफट
निम्न चुलबंद प्रकल्पग्रस्त : मोबदल्यात तफावत, शेतकऱ्यांमध्ये असंतोष
लवारी : गावालगत सिंचन प्रकल्प झाल्यास हरितक्रांती घडून जीवनमान उंचावेल अशी अपेक्षा लवारी येथील शेतकऱ्यांची होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी शेती सोडली. मात्र, शासनाने यात जमीनीचा लाभ देताना मोठी तफावत केली आहे. मोबदल्यासाठी शेतकऱ्यांची फरफट होत आहे.
साकोली तालुक्यातील लवारी या गावालगत निम्न चुलबंध प्रकल्पाची निर्मिती झाली. दरम्यान जमीन अधिग्रहीत करताना शासनाने गावातील शेतकऱ्यांना २०११ मध्ये ६५ हजार रूपये एकरी भाव दिला. गावाशेजारी प्रकल्प बनत असल्याने शेतकऱ्यांनी हरीतक्रांतीचे स्वप्न बघून त्यांच्या बागायती व कोरडवाहू शेती शासनाने निर्धारित केलेल्या भावात विकल्या. मात्र, चुलबंध नदीच्या पलिकडील वळद गावातील शेतकऱ्यांना यावर्षी त्याच अधिग्रहीत शेतीसाठी शासनाने १० लाख रूपये प्रति एकर मोबदला दिला. त्यामुळे लवारी येथील शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे. केवळ नदी आडवी असलेल्या गावाला देण्यात आलेल्या मोबदल्यात थोडाथोडका नाही तर, सुमारे ९ लाख ३५ हजारांची तफावत आहे. त्यामुळे शासनाने अधिग्रहीत केलेल्या लवारी येथील शेतकऱ्यांच्या जमीनीलाही तोच वाढीव मोबदला द्यावा, अशा मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते, यादोराव मेश्राम, गजानन किरणापुरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. (वार्ताहर)