अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी, मडेघाट शेतशिवारातील घटना
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: December 25, 2023 18:41 IST2023-12-25T18:40:53+5:302023-12-25T18:41:29+5:30
माणिक देवाजी मेश्राम (५०, मडेघाट) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी, मडेघाट शेतशिवारातील घटना
भंडारा : आपल्या शेतात पिकांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला चढविला. यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी, २५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील मडेघाट शेत शिवारात घडली. माणिक देवाजी मेश्राम (५०, मडेघाट) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.
माणिक मेश्राम यांची मडेघाट शेतशिवारात शेती आहे. घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे पिकांची पाहणी करण्यासाठी गेले असता शिकारीच्या शोधात दबा धरून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.
ही घटना परिसरातील शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ उपचारासाठी लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
लाखांदूरचे वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक गुलाब पोवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. जखमी शेतकऱ्याला शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली जात आहे.