शेतकरी सापडला आर्थिक कोंडीत
By Admin | Updated: July 22, 2015 01:13 IST2015-07-22T01:13:33+5:302015-07-22T01:13:33+5:30
कांद्री परिसरात उन्हाळी धान मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. उन्हाळी धान निघाल्यानंतर कांद्री येथे धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले.

शेतकरी सापडला आर्थिक कोंडीत
धानाचे चुकारे अडले : पावसाअभावी पेरणी करपली, रोवणी अडली
जांब (लोहारा) : कांद्री परिसरात उन्हाळी धान मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. उन्हाळी धान निघाल्यानंतर कांद्री येथे धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. मे महिन्यामध्ये परिसरातील शेतकऱ्यांनी धान विकले. परंतु त्यांना अजूनपर्यंत धानाचे चुकारे प्राप्त झाले नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
पावसाळा सुरु झाला असला तरी पाऊस नसल्याने उन्हाळ्याचे दिवस दिसत आहे. सुरुवातीला थोडा पाऊस आल्यानंतर शेतकऱ्यांनी महागडे बी बियाणे खरेदी करून पेरणी केली. पण आता पावसाने डोळे वटारल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे. पूर्वीच बँका, सोसायटीकडून कर्ज घेऊन बी बियाणे खरेदी करून शेतामध्ये पेरणी करण्यात आली. पण पावसाअभावी शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आली असल्याने आता पैसे कुठून आणावे हा प्रश्न शेतकऱ्यापुढे पडला आहे. सुलतानी संकटात शेतकरी सापडले असले तरी अजूनपर्यंत कांद्री परिसरातील शेतकऱ्यांचे उन्हाळी धानाचे चुकारे न झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.
सोसायटीकडे अजूनपर्यंत शासनाकडून शेतकऱ्यांचे चुकारे पाठविण्यात आले नाही. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. तरी धान खरेदी विक्री केंद्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून कांद्री येथील धान खरेदी केंद्रात धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचे धानाचे चुकारे त्वरीत देण्याची मागणी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कांद्री चे माजी अध्यक्ष प्रभाकर बारई तसेच शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची पाळी
जांब (लोहारा) : लोहारा, जांब, धोप, ताळगाव, सोरणा, कांद्री, हिवरा, सकरला, रोंघा, लेंडेझरी या परिसरात पावसाअभावी शेतामध्ये टाकलेले धानाचे पऱ्हे करपू लागले आहे. यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीची पाळी आली आहे. बँका, सोसायटीमधून कर्ज घेऊन या परिसरातील शेतकऱ्यांनी महागडे बी बियाणे खरेदी करून शेतामध्ये पेरणी केली. पण पावसाने दगा दिल्याने धान पऱ्हे तसेच विविध रोपे करपू लागली आहेत. यामुळे उत्पादन घेण्यासाठी आता पैसा कुठून आणायचा व शेतामध्ये पेरणी करावी हा बिकट प्रश्न शेतकऱ्यापुढे पडला आहे. शेतकरी सुलतानी संकटात सापडल्याने त्यांचा चेहरा पूर्णत: कोमेजलेला आहे. तरी शासनाने याकडे लक्ष देऊन दुबार पेरणीकरिता मोफत बी बियाणे पुरवठा करण्याची मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.