मेगाब्लॉकमुळे एक्स्प्रेसला ‘ब्रेक’

By Admin | Updated: July 26, 2015 00:57 IST2015-07-26T00:57:29+5:302015-07-26T00:57:29+5:30

तुमसर रोड रेल्वे स्थानकाजवळ मध्यरात्री मेगा ब्लाकचे काम सुरु असताना पॉइंटमध्ये तांत्रिक बिघाड झाला. याचा फटका शिवनाथ एक्स्प्रेस या प्रवासी गाडीला बसला.

Express 'break' due to megablock | मेगाब्लॉकमुळे एक्स्प्रेसला ‘ब्रेक’

मेगाब्लॉकमुळे एक्स्प्रेसला ‘ब्रेक’

पॉर्इंट न मिळाल्याने गाडी थांबली : रेल्वेचे चौकशीचे आदेश
तुमसर : तुमसर रोड रेल्वे स्थानकाजवळ मध्यरात्री मेगा ब्लाकचे काम सुरु असताना पॉइंटमध्ये तांत्रिक बिघाड झाला. याचा फटका शिवनाथ एक्स्प्रेस या प्रवासी गाडीला बसला. सुमारे दोन तास शिवनाथ एक्स्प्रेस तुमसर रोड रेल्वेस्थानकावर थांबली. या प्रकरणी गंभीर दखल रेल्वे बोर्डाने घेतली. संपूर्ण चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश नागपूर येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना देण्यात आले.
तुमसर रोड रेल्वे स्थानकाजवळ एल.एम. ५३२ रेल्वे फाटकासमीप शुक्रवारी रात्री १२ वाजेपासून मेगाब्लॉक करण्यात आले होते. नागपूर बिलासपूर शिवनाथ एक्स्प्रेस तुमसर रोड येथे रात्री २ च्या सुमारास पोहोचली.
गोंदिया मार्गावरील रेल्वे ट्रॅकवर स्विचमॅनने पॉइंट दिला. परंतु तांत्रिक बिघाडामुळे तो लागला नाही. मेगाब्लॉकमुळे त्याच्यात बिघाड झाल्याची माहिती आहे. यामुळे शिवनाथ एक्स्प्रेस पुढे गेली नाही.
पहाटे ४.१० मिनिटांनी हा तांत्रिक बिघाड दूर झाला व शिवनाथ एक्स्प्रेस पुढच्या प्रवासाला निघाली. या प्रकारामुळे शेकडो प्रवाशांना फटका बसला. नागपूर ते तुमसर रोड स्थानकापर्यंत आॅटो (स्वयंचलीत) सिग्नल प्रणाली सुरु झाली आहे. त्यामुळे एका पाठोपाठ गाड्यांचा क्रम येथे येणे व जाणे सुरु आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल रेल्वे बोर्डाने घेतली. पॉइंट का लागला नाही, तांत्रिक बिघाड कसा निर्माण झाला याची सविस्तर चौकशीचा अहवाल नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना मागितला आहे. यामुळे स्थानिक रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रात्री मेगा ब्लॉक केला. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. शुक्रवारी रात्रभर पाऊस पडला. ओलेचिंब होऊन रेल्वेचे कर्मचारी तथा अधिकाऱ्यांनी कर्तव्य पार पाडले. दिवसभर कर्मचाऱ्यांनी कामे केल्यावर पुन्हा मेगाब्लॉक घेण्यात आला. पावसामुळे (मेगाब्लॉक) रेल्वे ट्रॅक जोडताना येथे व्यत्यय आले अशी माहिती आहे.
या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी येणार असल्याचे समजते. मेगाब्लॉक प्रसंगी तुमसर रोड रेल्वेचे उपविभागीय रेल्वे अभियंता, इतर अभियंते तथा मोठा रेल्वे कर्मचाऱ्यांचा स्टॉफ कार्यरत होता. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Express 'break' due to megablock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.