- नरेश डोंगरे / गोपाळकृष्ण मांडवकर भंडारा - येथील आयुध निर्माणीमध्ये (ऑर्डनन्स फॅक्टरी) शुक्रवारी सकाळी भीषण स्फोट झाल्याने आतमध्ये काम करणाऱ्यांपैकी आठ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भंडारा शहराच्या दक्षिणेला जवळपास १६ किलोमीटर दूर अंतरावर जवाहरनगरजवळ भंडारा आयुध निर्माणी आहे. येथे अतिउच्च दर्जाच्या बारूद आणि स्फोटकांची निर्मिती, साठवणूक केली जाते. त्यासाठी वेगवेगळे सेक्शन आणि वेगवेगळ्या इमारती आहेत. यातीलच लो टेंपरेचर प्लास्टिक एक्सप्लोसिव्ह (एलटीपीई) च्या इमारतीत बारूदचे गोळे बनविण्याचे काम सुरू असताना सकाळी साडेदहा ते पावणेअकराच्या सुमारास अचानक भीषण स्फोट झाला. स्फोट एवढा शक्तिशाली होता की, एलटीपीईची भली मोठी इमारत जमीनदोस्त झाली आणि त्यामध्ये काम करणाऱ्या अनेक कामगारांच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या.
२४ रुग्णवाहिका दाखल घटनास्थळावरचे भीषण दृश्य बघता प्रशासनाने मोठ्या प्रमाणात अग्निशमन दलाचे बंब, २४ रुग्णवाहिका आणि चार मोठ्या क्रेन बोलावून घेतल्या. इमारतीच्या मलब्यात दबलेल्यांपैकी १३ जणांना बाहेर काढण्यात आले. त्यापैकी आठ मृत, तर पाच जणांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. जखमींना भंडाऱ्यातील लक्ष रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
स्फोटाचा घटनाक्रमसकाळी १०:४० : स्फोट १०:४५ : सायरन वाजला११:३० : घटनास्थळी गर्दी ११:३५ : रुग्णवाहिका दाखल होण्यास सुरुवात दुपारी १२.०० : प्रशासकीय अधिकारी पोहोचले२:०० : पहिला मृतदेह बाहेर काढला२:३० : एनडीआरएफ पथक दाखल झालेरात्री ८:२० : सातवा मृतदेह मलब्यातून बाहेर काढला
मृतांची नावे चंद्रशेखर गोस्वामी (५९), मनोज मेश्राम (५५), अजय नागदेवे (५१), अंकित बारई (२०), लक्ष्मण केलवदे (३८), अभिषेक चौरसिया (३५), धर्मा रंगारी (३५), संजय कोरेमोरे (३२)
जखमींची नावे एन. पी. वंजारी (५५), संजय राऊत (५१), राजेश बडवाईक (३३), सुनील कुमार यादव (२४) जयदीप बॅनर्जी (२२)
पंचक्रोशी हादरली, १२ किमी परिसरात दहशतस्फोटामुळे घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसराला जबर हादरा बसला. इमारतीतील लोखंडी पत्रे तसेच इतर अवजड साहित्य पत्त्याप्रमाणे उंच हवेत उडून वेगवेगळ्या ठिकाणी पडले. हादऱ्यांमुळे आजूबाजूच्या सुमारे १० ते १२ किलोमीटरपर्यंतच्या परिसरात भीती निर्माण झाली. दुर्घटनेची कल्पना येताच धोक्याचा सायरन वाजला आणि परिसरातील गावांमधून लोक घटनास्थळाकडे धावले.
...अन् गावात एकच आक्राेशस्फोटात साहुली गावचा अंकित बारई (२२) दगावला. सकाळी आनंदाने कामावर गेल्यानंतर त्याचा मृतदेहच गावात येईल, याची जराही कल्पना नसलेल्या गावाने त्याच्या मृत्यूची बातमी ऐकली अन् एकच आक्रोश झाला. तो बी. कॉमच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. अप्रेंटिसशिप मिळाल्याने तो येथे कामावर होता.
भंडारा आयुध निर्माणीमध्ये झालेल्या स्फोटाबद्दल जाणून खूप दुःख झाले. शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या संवेदना. जखमी लवकर बरे व्हावे. बाधितांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. - राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री
५ लाखांचे आर्थिक सहाय्यभंडारा आयुध निर्माणी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाखांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.